

नवजात बाळाची ४० हजारांना विक्री
नालासोपाऱ्यातील प्रकार; अल्पवयीन मुलीची आई, डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा
नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) : नालासोपारा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवजात बाळाची ४० हजार रुपयांना विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला तरुण, तिची आई, शेजारीण महिला, प्रसूती करणाऱ्या डॉक्टर आणि बाळ खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दाम्पत्याविरोधात तुळिंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील तरुणाला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा पूर्व परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे त्याच परिसरातील २२ वर्षीय तरुणासोबत संबंध होते. त्यातून ती गर्भवती राहिली. याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आईने रविवारी (ता. ११) तिला संतोष भवन परिसरातील सूर्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. शाहीन शेख यांनी कथितरीत्या बेकायदा मुदतपूर्व प्रसूती केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवजात बाळाची नालासोपाऱ्यातील एका दाम्पत्याला ४० हजार रुपयांना विक्री केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलीला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. दरम्यान, सोमवारी मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने तिला वसई-विरार महापालिकेच्या तुळिंज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तपासणीदरम्यान तिची नुकतीच प्रसूती झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. रुग्णालय प्रशासनाने सोमवारी रात्री तुळिंज पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
....
तरुणाला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक
तुळिंज पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या २२ वर्षीय तरुणाला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवजात बाळ खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दाम्पत्याला गेल्या १४ वर्षांपासून अपत्य नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी दिली.
....
रुग्णालय सील
या घटनेनंतर वसई-विरार महापालिकेने सूर्या रुग्णालय सील केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अध्यक्ष नीलेश देशमुख यांनी बेकायदा प्रसूती करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळिंज पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.