

श्रीवर्धनच्या किनाऱ्याला सुरक्षाकवच
बुडणाऱ्या पर्यटकांच्या बचावासाठी आधुनिक यंत्र; नगर परिषदेला रोबोटिक बोया प्रदान
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी अत्याधुनिक ‘रोबोटिक बोया’ (रोबोटिक वॉटर क्राफ्ट) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये श्रीवर्धन नगर परिषदेलाही एका रोबोटिक बोयाचे वितरण करण्यात आले आहे. या उपकरणामुळे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांच्या बचावकार्यात वेग येणार असून, आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षकांना मोठी मदत मिळणार आहे.
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या उपकरणांचे वितरण करण्यात आले. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
रिमोट कंट्रोलद्वारे बचावकार्य
रोबोटिक बोया हे रिमोट कंट्रोलद्वारे चालवले जाणारे आधुनिक बचाव उपकरण आहे. समुद्रात भरती-ओहोटीच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत पाण्यात अडकलेल्या अथवा बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत हे यंत्र वेगाने पोहोचू शकते. सुमारे २०० किलो वजन ओढून आणण्याची क्षमता असल्याने एकाच वेळी दोन व्यक्तींच्या बचावासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
या उपकरणामुळे जीवरक्षकांना स्वतःचा जीव धोक्यात न घालता संकटात सापडलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवणे शक्य होणार आहे. श्रीवर्धन नगर परिषदेला मिळालेल्या रोबोटिक बोयामुळे आपत्कालीन बचावकार्य अधिक जलद आणि सुरक्षित होण्यास मदत मिळेल.
बचावकार्यात तत्परतेला प्राधान्य
श्रीवर्धन नगर परिषदेला मिळालेल्या रोबोटिक बोयामुळे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांच्या बचावकार्यात मोठी मदत होणार आहे. पर्यटकांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरेल. या यंत्रणेचा प्रभावी वापर करून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत देण्यास आम्ही प्राधान्य देऊ, असे श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.