फटाक्यांतील रसायनांमुळे प्रदूषणाचा धोका

फटाक्यांतील रसायनांमुळे प्रदूषणाचा धोका
Published on: 

फटाक्यांतील रसायनांमुळे प्रदूषणाचा धोका
१७ नमुन्यांच्या तपासणीत बेरियमसह विविध घटक; आवाज फाउंडेशनची निर्बंधांच्या कडक अंमलबजावणीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर असलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी ‘आवाज फाउंडेशन’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मोहम्मद अली रोड आणि कुर्ला येथून ९ आणि १० ऑक्टोबरला खरेदी केलेल्या १७ फटाक्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली. यापैकी अनेक नमुन्यांमध्ये बेरियमसह विविध रासायनिक घटक आढळल्याचा दावा संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे हे फटाके ‘ग्रीन फटाके’ म्हणून विकले जात असतानाही काहींवर क्यूआर कोड नसल्याचे, तर काही क्यूआर कोड बनावट असल्याचे तपासणीत आढळल्याचे संस्थेने म्हटले आहे.
संस्थेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरील निर्बंधांची विक्रीपासून प्रत्यक्ष वापरापर्यंत काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. पोलिस आणि महापालिकेकडून फटाक्यांच्या विक्री केंद्रांना परवाने दिले जात असल्याने परवानाधारक विक्रेत्यांकडील फटाक्यांचीही तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘ग्रीन फटाके’ म्हणून नमूद केलेल्या काही नमुन्यांवर क्यूआर कोड असल्याचे दिसून आले, तर काहींवर क्यूआर कोडच नसल्याची नोंद आहे. काही नमुन्यांच्या क्यूआर कोडच्या तपासणीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ ‘ग्रीन फटाके’ असा उल्लेख किंवा पॅकेजिंगवरील क्यूआर कोड पाहून त्यांची पर्यावरणपूरकता निश्चित करता येते का, याची तपासणी करण्याची मागणी पुढे आली आहे.

काही नमुन्यांमध्ये बेरियमचे प्रमाण
तपासणी केलेल्या नमुन्यांमध्ये बेरियमचे प्रमाण वेगवेगळे आढळले. उदाहरणार्थ ‘कलर कोटी’ या फटाक्याच्या नमुन्यात बेरियमचे प्रमाण ८.७४ टक्के, ‘पूजा प्लेन’मध्ये १३.६१३ टक्के, तर ‘लिओ’ या नमुन्यात ९.९४१ टक्के बेरियम आढळल्याची नोंद तपासणी अहवालात आहे. ‘सर्पेंट एग बिग’ या नमुन्यात बेरियमचे प्रमाण २७.४०५ टक्के नोंदविण्यात आले आहे.

निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची मागणी
नवरात्र, देवी विसर्जन, दसरा, गुरू नानक जयंती, नाताळ आणि नववर्षाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांचा वापर होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वितरण, विक्री आणि प्रत्यक्ष वापर या तिन्ही टप्प्यांवर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. फटाक्यांबरोबरच विविध सणांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक आणि लेझर दिव्यांच्या वापरावरही निर्बंध घालावेत, अशी मागणी संस्थेने केली आहे. गणेशोत्सवातील ध्वनिक्षेपक, फटाके आणि लेझर दिव्यांच्या वापराबाबत २६ आणि २८ सप्टेंबरला सरकारचे लक्ष वेधण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.

प्रदूषणाचा धोका वाढण्याची भीती
हिवाळ्यात वातावरणातील प्रदूषक घटक साचून राहण्याची शक्यता अधिक असल्याने फटाक्यांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका संस्थेने मांडली आहे. त्यामुळे सणांच्या काळात हवेची गुणवत्ता आणि नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

१७ नमुन्यांची तपासणी
मोहम्मद अली रोड आणि कुर्ला येथून खरेदी केलेल्या १७ फटाक्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. अहवालात विविध नमुन्यांमध्ये ॲल्युमिनियम, गंधक, सिलिकॉन, पोटॅशियम तसेच बेरियमसह अनेक रासायनिक घटकांची नोंद आहे. काही नमुन्यांमध्ये बेरियमचे प्रमाण लक्षणीय असल्याचे अहवालातून दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com