शिवडीची ग्रामदेवता मरीमाता

शिवडीची ग्रामदेवता मरीमाता
Published on: 

शिवडीतील स्वयंभू मरीमाता

शिवडीतील स्वयंभू श्री मरीमाता देवीचे मंदिर सुमारे दोनशे वर्षांच्या परंपरेची साक्ष देत आहे. पूर्वी हमालांकडून एका मोकळ्या जागेत देवीच्या शिळेची पूजा केली जात असे. कालांतराने स्थानिकांच्या श्रद्धेतून या पूजास्थानाचे मंदिरात रूपांतर झाले. आज नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, देवीची जत्रा आणि साई भंडारा अशा विविध धार्मिक उपक्रमांमुळे हे देवस्थान भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे.
पूर्वजांकडून सांगितल्या जाणाऱ्या माहितीनुसार, सुमारे दोनशे वर्षांपूर्वी शिवडीतील मंदिराच्या उजव्या बाजूला मोठे पटांगण होते. या ठिकाणी खासगी कंपन्यांचे सामान उतरवले जात असे. सामान उतरवण्यासाठी काम करणारे काही मद्रासी हमाल या पटांगणातील श्री मरीमाता देवीच्या शिळेची पूजा करीत असत.
काही काळाने या मोकळ्या जागेभोवती संरक्षक तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरू झाले. त्या वेळी एका मद्रासी पुजाऱ्याने देवीची मूर्ती तेथून दुसरीकडे नेण्याचे ठरवले. पटांगणाच्या मध्यभागी सुमारे २५ ते ३० फूट उंचीचे लाकडी प्रवेशद्वार होते. त्याला मोठ्या साखळीने कुलूप लावलेले होते. पुजारी मूर्ती घेऊन बाहेर पडत असताना प्रवेशद्वाराचे कुलूप अचानक निखळून पडले आणि दरवाजा उघडला, अशी आख्यायिका सांगितली जाते.
त्यानंतर पुजाऱ्याने एका कंपनीच्या सिमेंटच्या भिंतीजवळ देवीची मूर्ती ठेवली आणि तिच्या संरक्षणासाठी लोखंडी पत्रे लावले. स्थानिकांना देवीची पूजा-अर्चा आणि देखभाल करण्यास सांगितले. पुढे देवीविषयीची श्रद्धा वाढत गेली आणि स्थानिकांनी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, असे श्री मरीमाता मंदिर उत्कर्ष सेवा मंडळाचे सचिव रवींद्र शिंगे यांनी सांगितले.
शिवडी गाडी अड्डा पूर्व येथील अखिल गाडी अड्डा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना १९६५ मध्ये झाली. यंदा मंडळाच्या नवरात्रोत्सवाचे ६१ वे वर्ष आहे. नवरात्रोत्सवासह वर्षभर देवीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुहास (बाबू) शिलधनकर यांनी सांगितले.

मंदिराचा टप्प्याटप्प्याने विस्तार
सुरुवातीला लोखंडी पत्र्यांचे संरक्षण असलेल्या मूर्तीसाठी पाच बाय पाच फुटांचे छोटे मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर २३ बाय १८ फुटांचे मंदिर उभारण्यात आले. पुढे सुमारे २५ वर्षांनी मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. आता ८० बाय ३० फुटांच्या आवारात मंदिर विकसित करण्याचा संकल्प श्री मरीमाता उत्कर्ष सेवा मंडळाने केला आहे, अशी माहिती मंडळाचे खजिनदार इंद्रदेव मिश्रा यांनी दिली.

संकलन : भारती बारस्कर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com