उड्डाणपुलाखालील ‘अक्षरक्रांती’ घडवणारी सरस्वती!

उड्डाणपुलाखालील ‘अक्षरक्रांती’ घडवणारी सरस्वती!
Published on: 

उड्डाणपुलाखालील ‘अक्षरक्रांती’ घडवणारी सरस्वती!
कंवल कतिजा यांच्या प्रयत्नांमुळे वंचित मुलांच्या आयुष्यात नवतेज
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः नवरात्रोत्सवात घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये आदिशक्तीच्या, देवीच्या विविध रूपांची पूजा-अर्चा केली जात आहे. शक्ती, समृद्धी आणि ज्ञानाची देवता म्हणून आपण देवीची रूपे पुजतो; पण खऱ्या अर्थाने समाजातील अंधार दूर करून ज्ञानाचा दिवा लावणारी ‘ज्ञानदात्री सरस्वती’ आज आपल्या आसपासच्या महिलांच्या रूपातच कार्यरत असलेली पाहायला मिळते. अशीच ज्ञानाची आणि आशेची ज्योत तेवत ठेवणारी आधुनिक ‘ज्ञानसरस्वती’ म्हणजे समाजसेविका कंवल कतिजा!
वाशी आणि खारघरच्या उड्डाणपुलांखालील धुळीत, रस्त्याच्या कडेला आणि बांधकाम स्थळांवर राहणाऱ्या अत्यंत वंचित बालकांच्या आयुष्यातून अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी कंवल कतिजा यांनी अनिल तायडे यांच्या साथीने गेल्या १२ वर्षांहून अधिक काळापासून सुमारे २०१२ पासून ‘ऑगस्ट क्रांती’ या चळवळीच्या माध्यमातून एका अनोख्या शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवली आहे. आपल्या समाजात नवरात्रीच्या काळात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते; पण कवल कतिजा यांनी वाशी उड्डाणपुलाखाली, खारघरमधील बांधकाम स्थळांवर, सीवूड्स आणि जुईनगर परिसरातील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या आयुष्यातच शिक्षणाचे अधिष्ठान निर्माण केले. ज्या वयात हातात पाटी-पेन्सिल असायला हवी त्या वयात सिग्नलवर भीक मागणाऱ्या आणि बालमजुरीकडे ढकलल्या जाणाऱ्या लहान मुलांना त्यांनी मायेच्या छत्राखाली एकत्र केले आणि त्यांच्या पालकांचे सातत्याने समुपदेशन करून भिकेच्या तावडीतून मुलांची सुटका केली. त्यांचे हे कार्य केवळ मुलांपुरते मर्यादित नसून, कर्करोगग्रस्त बालके (टाटा मेमोरिअल, भारत सेवाश्रम) आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या जीवनात (पारिजात ओल्ड एज होम, स्मित फाउंडेशन) नाटकांच्या माध्यमातून आनंद पेरण्याचे कामही त्या करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते ‘ऑगस्ट क्रांती’ला उत्कृष्ट एनजीओ म्हणून सन्मानितही करण्यात आले आहे. नवरात्रीच्या या पावन पर्वात जिथे आपण स्त्रीशक्तीचा जागर करतो तिथे कंवल कतिजा यांच्यासारख्या ‘सरस्वतीरूपी’ महिला प्रत्यक्ष कृतीतून समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाची आणि स्वाभिमानाची दिशा दाखवत आहेत. उड्डाणपुलाखालून सुरू झालेली ही अक्षरक्रांती आज शेकडो मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचा सण साजरा करीत आहे.

कला, संस्कृती आणि नाटकांतून ‘अक्षरओळख’
देवी सरस्वती जशी कला आणि विद्येची अधिष्ठात्री आहे, तसाच मार्ग कंवल कतिजा यांनी निवडला. कोणत्याही इमारतीचा आश्रय न घेता उघड्यावरच त्यांनी मुलांसाठी शाळा सुरू केली. पुस्तकी नीरस अभ्यासाऐवजी चित्रकला, हस्तकला, संगीत, खेळ, नृत्य आणि नाटकांच्या माध्यमातून मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. या मुलांनी बनवलेली कागदी फुले व वस्तूंचे प्रदर्शन डोमिनोज पिझ्झा, सेंटर वन मॉल आणि स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये भरवून त्यांच्यातील आत्मसन्मान जागा केला.

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारी ‘शक्ती’
केवळ उड्डाणपुलाखाली शिक्षण देऊन त्या थांबल्या नाहीत, तर या वंचित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अथक लढा दिला. सुरुवातीला महापालिकेच्या शाळांकडून नकार मिळूनही त्यांनी चिकाटी सोडली नाही. वाशी गावातील आणि जुहू गाव पालिका शाळेत एकाच वेळी १५ ते २० हून अधिक मुलांना रीतसर प्रवेश मिळवून दिला. मुले शाळेत नियमित जावीत यासाठी त्या स्वतः वॉक टू स्कूल उपक्रम राबवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com