आयआयटी मुंबईच्या नवीन मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांची जात, जेईई क्रमांक विचारणे हा भेदभाव;

आयआयटी मुंबईच्या नवीन मार्गदर्शक सूचना
विद्यार्थ्यांची जात, जेईई क्रमांक विचारणे हा भेदभाव;
Published on: 

आयआयटी मुंबईच्या नवीन मार्गदर्शक सूचना
विद्यार्थ्यांची जात, जेईई क्रमांक विचारणे हा भेदभाव
मुंबई, ता. १४ : विद्यार्थ्यांची जात, प्रवेशाची प्रवर्गवारी, जेईई (ॲडव्हान्स्ड) मधील क्रमांक किंवा गेटचे गुण विचारणे अयोग्य असून, अशा प्रश्नांमुळे भेदभावाला प्रोत्साहन मिळू शकते, असे आयआयटी मुंबईने म्हटले आहे. संस्थेच्या परिसरात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर संस्थेने भेदभावविरोधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मंगळवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये संस्थेने म्हटले आहे, की केवळ उत्सुकतेपोटी विचारलेले असे प्रश्नही पूर्वग्रह निर्माण करू शकतात आणि विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची जात किंवा त्यांच्याशी संबंधित पार्श्वभूमी उघड होईल, अशा संभाषणांपासून दूर राहावे. त्याऐवजी समान आवडी-निवडींच्या आधारे मैत्री निर्माण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थी कल्याण विभागाच्या अधिष्ठाता कार्यालयाने स्पष्ट केले, की जात, धर्म किंवा सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सलोखा निर्माण होईल, असे सर्वसमावेशक वातावरण आयआयटी मुंबईला उभे करायचे आहे. भारतीय संविधानातील आरक्षण धोरणाची अंमलबजावणी त्यातील तरतुदी आणि मूळ उद्देशानुसार करण्यासाठी तसेच प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचेही ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मार्गदर्शक सूचनांनुसार, सहविद्यार्थ्याला त्याची जन्माधारित किंवा प्रवेशाची प्रवर्गवारी विचारणे अयोग्य आहे. अशा प्रश्नांमुळे जाणीवपूर्वक किंवा नकळत पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. याशिवाय जेईई (ॲडव्हान्स्ड)मधील क्रमांक, गेटचे गुण किंवा विद्यार्थ्याची जात अथवा संबंधित पार्श्वभूमी उघड होण्याची शक्यता असलेली अन्य माहिती विचारण्यापासूनही संस्थेने विद्यार्थ्यांना सावध केले आहे.
ई-मेलमध्ये म्हटले आहे, ‘‘प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला तो निरुपद्रवी वाटू शकतो आणि त्यामागे केवळ उत्सुकताही असू शकते. मात्र, असा प्रश्न विचारल्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर अनेकदा विपरीत परिणाम होऊ शकतो.’’
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विभाग, क्रीडा, संगीत, चित्रपट, छंद तसेच ते ज्या शाळा, महाविद्यालये, गावांमधून किंवा शहरांमधून आले आहेत, अशा समान संदर्भांच्या आधारे मैत्री वाढवावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. अपमानास्पद, द्वेषपूर्ण, जातीयवादी किंवा लिंगभेद करणारे संदेश पाठवणे अथवा पुढे प्रसारित करण्यासही मार्गदर्शक सूचनांमध्ये मनाई करण्यात आली आहे. धर्म किंवा लैंगिक अभिमुखतेच्या आधारे पूर्वग्रह दर्शविणारा मजकूर प्रसारित करण्यासही बंदी आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, ई-मेल, अन्य ऑनलाइन मंच किंवा प्रत्यक्ष संवादातून छळ अथवा धमकावण्याच्या स्वरूपाचे वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा देत संस्थेने विद्यार्थ्यांना इतरांशी नम्रतेने आणि त्यांच्या भावनांचा आदर राखून वागण्याचे आवाहन केले आहे.
------
ई-मेलवर टीका
आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील ‘जस्टिस कॉर्नर’ येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या ई-मेलवर टीका केली आहे. २०२३ मध्ये दर्शन सोळंकी यांच्या मृत्यूनंतरही संस्थेने असाच ई-मेल पाठवला होता, असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com