बारवी धरण मार्गावर प्रवाशांचे हाल

बारवी धरण मार्गावर प्रवाशांचे हाल
Published on: 

मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : मुरबाड-बारवी धरणमार्गे बदलापूर या रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने या मार्गावरील एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन ते चार महिने लागण्याची शक्यता असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. पर्यायी मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना ३० रुपये जादा मोजावे लागत असून, प्रवासासाठी अर्धा तास अधिक लागतो. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी एसटी बस वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या मार्गावरील बेलपाडा गावापासून बारवी धरणापर्यंतच्या परिसरातील नागरिकांना बससेवा बंद झाल्याचा मोठा फटका बसत आहे. शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, तसेच दररोज नोकरी-व्यवसायासाठी मुरबाड आणि बदलापूर येथे ये-जा करणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी बससेवा पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
रस्त्याचे काम सुरू असतानाही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी. काँक्रीटीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी एसटी बस सुरक्षितपणे जाऊ शकेल, असा पर्यायी रस्ता तयार केल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


प्रवाशांच्या सुरक्षेला धोका
बारवी धरण मार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला झाड असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणाहून एसटी बस नेल्यास लोखंडी सळ्या बसच्या टायरमध्ये घुसण्याची, तसेच झाडाच्या फांद्या बसच्या छताला घासून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणाहून बस वाहतूक सुरू करणे शक्य नसल्याचे मुरबाड एसटी आगाराचे व्यवस्थापक योगेश मुसळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com