

मोगली धरण पालिकेच्या ताब्यात घ्या!
पाणीपुरवठा वाढवण्यासाठी विजय चौगुले यांचा महासभेत मुद्दा
वाशी, ता. १४ (बातमीदार) ः दिघा परिसरातील रेल्वेच्या अखत्यारीत ‘मोगली धरण/तलाव’ पालिकेकडे हस्तांतरित करून त्याचे खोलीकरण व पुनरुज्जीवन करावे, तसेच तेथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी महापालिका सचिवांकडे लक्षवेधी सूचनेद्वारे केली आहे. आगामी सर्वसाधारण सभेत ही लक्षवेधी चर्चेला घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दिघा व ऐरोलीमध्ये वाढते नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेता, या परिसरासाठी स्थानिक व स्वतंत्र जलस्रोत विकसित करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन व सक्षम बनवण्यासाठी पालिका क्षेत्रात किंवा लगत उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे चौगुले यांनी नमूद केले आहे.
मोगली धरणाचा सध्याचा वापर, मालकी हक्क, एकूण क्षेत्रफळ आणि साठवण क्षमता याबाबत पालिका प्रशासनाने रेल्वेकडून अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी. या धरणाचा रेल्वेला सध्या किंवा भविष्यात उपयोग नसेल, तर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हे धरण पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी केंद्र व रेल्वे प्रशासनाकडे त्वरित औपचारिक प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्प उभारा
धरणाचा तांत्रिक अभ्यास करून सुरक्षितपणे भिंतीची उंची वाढवण्याबाबत चाचण्या घेण्यात याव्यात. याशिवाय, धरणातील पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी आधुनिक वॉटर ट्रीटमेंट प्लांट, रो वॉटर इनटेक सिस्टीम, पंपिंग स्टेशन आणि स्थानिक जलवितरण नेटवर्कशी जोडणी समाविष्ट असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आगामी महासभेत या लक्षवेधीवर प्रशासन काय सकारात्मक पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.