

‘फॉर्म्युला-४’मुळे होणार कोट्यवधींची उलाढाल!
नवी मुंबई गतीचा थरार अनुभवण्यास सज्ज;
सुजित गायकवाड, सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : पामबीच मार्गावर रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फॉर्म्युला-४’ कार रेसिंगमुळे नवी मुंबईला जागतिक स्तरावर ओळख मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. एफ४ इंडिया चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ५ आणि ६ डिसेंबरला पार पडणार आहे. या स्पर्धेमुळे शहरातील पर्यटन, हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर स्पर्धेसाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे शहराच्या विकासालाही गती मिळणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॉर्म्युला-४ ट्रॅक आणि त्याशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला या कामासाठी महापालिकेकडून ३३ कोटी ७९ लाख ७१ हजार ३६३ रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीने कंत्राट देण्यात आले होते आणि प्रत्यक्ष कामासाठी ३१ कोटी ९३ लाख ६० हजार २४४ रुपयांची आर्थिक मंजुरी देण्यात आली होती. रस्त्याचे काम पुढे जात असताना तांत्रिक बदल, डिझाईन मधील सुधारणा आणि प्रत्यक्ष जागेवरील आवश्यक बाबींमुळे आतापर्यंत या रस्त्यावर आणि विकासकामांवर जवळपास ३० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे. तसेच, कामातील नवीन सुधारित निविदेनुसार आणखी सात कोटी ८९ लाख रुपयांच्या अतिरिक्त कामांची भर पडून एकूण सुधारित निविदा रक्कम ३९ कोटी ८३ लाख २७ हजार ९७९ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आगामी तीन महिन्यांत उर्वरित आणि अतिरिक्त कामे पूर्ण करून हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पूर्णपणे सज्ज केला जाणार आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमुळे शहरात मोठी आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
----------------
अर्थव्यवस्थेला चालना
स्पर्धेसाठी देश-विदेशातील रेसर्स, तांत्रिक पथके, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि प्रेक्षक नवी मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, स्थानिक वाहतूक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या संधी मिळतील. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रातील आर्थिक व्यवहार वाढू शकतात. या एकाच आयोजनातून पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात तब्बल शेकडो कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित मानली जात आहे. परदेशी पर्यटक आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रेक्षकांमुळे स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे शहराच्या अंतर्गत अर्थचक्राला मोठी गती मिळेल.
----------
नवी मुंबईला काय मिळणार?
फॉर्म्युला-४ रेसिंगमुळे नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची संधी आहे. पामबीच मार्गावरील विकसित करण्यात येणाऱ्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग भविष्यात मोठ्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होऊ शकतो. अशा आयोजनांमुळे शहरातील पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळू शकते. शहराची आधुनिक आणि विकसित शहर म्हणून प्रतिमा उंचावण्यासही मदत होईल. भविष्यात या सुविधांचा नियमित वापर आणि नव्या गुंतवणुकीच्या संधी वाढल्यास शहराच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.