

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रामलीलेचा वारसा
मालाडमधील रामलीलेत कुटुंबांच्या दोन-दोन पिढ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मालाड पश्चिम येथे सुरू असलेली रामलीला केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम राहिलेली नसून, अनेक कुटुंबांसाठी पिढ्यान्पिढ्या जपली जाणारी परंपरा बनली आहे. ‘श्री रामलीला प्रचार समिती’ आणि ‘श्री राम मानस मंच’ यांच्या वतीने आयोजित या रामलीलेत काही कुटुंबांतील दोन पिढ्या एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत. अभिनयाबरोबरच या माध्यमातून सांस्कृतिक मूल्ये आणि परंपराही पुढच्या पिढीकडे सोपविली जात आहे.
मुरादाबाद येथील कलाकारांची ही मंडळी गेल्या ४४ वर्षांपासून मुंबईत रामलीलेचे सादरीकरण करीत आहेत. काही कलाकार लहानपणापासून या परंपरेशी जोडलेले आहेत, तर काहींनी गेल्या काही वर्षांत भूमिका स्वीकारल्या आहेत.
संजय भारद्वाज हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे वरिष्ठ शिक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबातील दोन मुलांसह मुलींनीही यापूर्वी रामलीलेत विविध भूमिका केल्या आहेत. सध्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परीक्षेची तयारी करणारा यश यंदा रामाच्या भूमिकेत दिसत आहे. रामाची भूमिका साकारताना आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
नमिता सक्सेना गेल्या चार वर्षांपासून सीतेची भूमिका साकारत आहे. तिच्या कुटुंबाचाही रामलीलेशी जुना संबंध आहे. तिच्या भावाने यापूर्वी रामाची भूमिका केली आहे, तर आत्या आणि काकाही संस्थेच्या कामात सक्रियपणे सहभागी राहिले आहेत. लखनौ विद्यापीठातून नमिता शारीरिक शिक्षण विषयातील पदवीचे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच रामलीलेत भूमिका साकारत ती कुटुंबाची सांस्कृतिक परंपरा पुढे नेत आहे.
आस्था ढींगरा हिचे रामलीलेशी नाते अगदी लहानपणापासूनचे आहे. दोन-तीन वर्षांची असल्यापासून ती या आयोजनाचा भाग आहे. सध्या ती रामलीलेत महागौरीची भूमिका साकारत आहे. तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य यापूर्वी रामलीलेत सहभागी झाले आहेत. आई-वडीलही या आयोजनात सहभागी होत असत, तर तिचा धाकटा भाऊ हनुमानाची भूमिका साकारत असे.
मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आस्था सध्या डिजिटल विपणन संस्थेत कार्यरत आहे. व्यावसायिक क्षेत्रात काम करत असतानाही बालपणापासून जोडलेली रामलीलेची परंपरा तिने कायम ठेवली आहे.
व्यवसाय सांभाळून रामलीलेची सेवा
मुरादाबाद येथील औषध व्यावसायिक राजेश रस्तोगी गेल्या ४४ वर्षांपासून रामलीलेशी जोडलेले आहेत. यापूर्वी त्यांनी दशरथ आणि दुर्योधनाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते रावण आणि केवटाची भूमिका साकारतात. व्यवसायाची धावपळ असतानाही रामलीलेच्या सादरीकरणासाठी ते सुमारे दोन महिने आधीपासून तयारी आणि सराव सुरू करतात. रस्तोगी यंदाही मुरादाबादहून सुमारे ६० कलाकारांची टीम घेऊन मुंबईत आले आहेत. कलाकारांच्या रंगभूषेपासून नव्या कलाकारांना भूमिका समजावून देण्यापर्यंतची जबाबदारीही ते सांभाळतात. त्यामुळे त्यांच्या सहभागात अभिनयाबरोबरच या परंपरेला पुढे नेण्याची भूमिकाही महत्त्वाची ठरते.
रंगमंचावर सासरे-जावई, प्रत्यक्षात पिता-पुत्र
रामलीलेच्या कथेत राजा जनक आणि राम यांचे नाते सासरे-जावयाचे आहे, मात्र मालाडच्या रंगमंचामागे हेच नाते पिता-पुत्राचे आहे. राजा जनकाची भूमिका साकारणारे संजय भारद्वाज गेल्या ४४ वर्षांपासून रामलीलेशी जोडलेले आहेत. यंदा त्यांचा मुलगा यश पहिल्यांदाच रामाची भूमिका साकारत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.