

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महापालिकेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सहा प्रसूतिगृहांना अनेक वर्षांनंतर प्रथमच अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. अतिरिक्त आयुक्त मेजर डॉ. नितीन राठोड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य संस्थांमधील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाली.
महापालिकेच्या आरोग्य संस्थांना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नसल्याची बाब मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर राठोड यांनी या विषयाला प्राधान्य दिले. रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यासाठी तृतीय पक्ष संस्थेची नियुक्ती करण्यात आली. या संस्थेमार्फत सर्व आरोग्य केंद्रे आणि प्रसूतिगृहांचे स्क्रीनिंग करून अग्निसुरक्षेच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यक अर्ज व अहवाल अग्निशमन विभागाकडे सादर करण्यात आले. या प्रक्रियेनंतर महापालिकेच्या सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि सहा प्रसूतिगृहांना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे एकूण ३९ आरोग्य संस्थांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
आरोग्य केंद्रे आणि प्रसूतिगृहांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण, गर्भवती महिला, नवजात बालके आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. अशा ठिकाणी आग लागण्यासारखी आपत्कालीन घटना घडल्यास जीवितहानी टाळण्यासाठी अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य संस्थांना ना हरकत प्रमाणपत्र मिळणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
अग्निसुरक्षा प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण
पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अग्निसुरक्षा प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणादरम्यान आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी, अग्निशमन उपकरणांचा वापर, आग विझविण्याच्या प्राथमिक पद्धती आणि आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितरीत्या बाहेर पडण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, उपलब्ध साधनांचा योग्य वापर करणे आणि रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी समन्वयाने काम करणे, याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
आरोग्यसेवा सक्षम करताना केवळ उपचारांच्या दर्जावर भर न देता रुग्णालयांतील पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारीही महत्त्वाची आहे. दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असल्यास बचावकार्याला मदत होऊ शकते आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे पालिकेच्या सर्व ३९ आरोग्य संस्थांना ना हरकत प्रमाणपत्र मिळणे हा आरोग्यसेवेतील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
- मेजर डॉ. नितीन राठोड,
अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.