फळ बाजाराच्या प्रवेशद्वाराची दुरवस्था

फळ बाजाराच्या प्रवेशद्वाराची दुरवस्था
Published on: 

एपीएमसी फळ बाजाराच्या प्रवेशद्वाराची दुरवस्था
मोजमाप होऊनही दुरुस्ती रखडली
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारातील पाचव्या प्रवेशद्वारावरील पुलाची दुरवस्था झाली असून, अपघाताचा धोका वाढला आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी अभियंता विभागाने सुमारे १५ दिवसांपूर्वी मोजमाप केले असले, तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे बाजारात येणारे व्यापारी, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तुर्भे गाव सेक्टर २१ आणि सिटी मॉलच्या शेजारी असलेल्या या प्रवेशद्वारातून दररोज व्यापारी, ग्राहक, कर्मचारी, अधिकारी आणि अन्य बाजार घटकांची वर्दळ असते. परिसरात फळ बाजाराची मध्यवर्ती इमारत, विविध बँका आणि कार्यालये असल्याने या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, मात्र प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.
प्रवेशद्वारावरील काँक्रीटची मोठ्या प्रमाणात झीज झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काँक्रीटमधून बाहेर आलेल्या टोकदार लोखंडी सळ्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या सळ्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे.
या प्रवेशद्वारातून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असली, तरी दुचाकी, चारचाकी वाहने आणि लहान टेम्पोंची ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे, हे प्रवेशद्वार नाल्यावरील पुलावर असल्याने रस्त्याची दुरवस्था अधिक चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे केवळ खड्डे बुजविण्याऐवजी पुलाच्या संरचनेची तपासणी करून आवश्यक ती कायमस्वरूपी दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
पुलाच्या दुरुस्तीसाठी अभियंता विभागाने १५ दिवसांपूर्वी मोजमाप केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच काम सुरू होईल, अशी अपेक्षा बाजार घटकांना होती, मात्र अद्याप दुरुस्ती सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
एपीएमसी प्रशासनाने पाचव्या प्रवेशद्वारावरील पुलाची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. तसेच दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी बाजार घटकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com