

नवी मुंबईत १० टक्के पाणीकपात
राज्य सरकारचे आदेश; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून राज्यातील शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबईतही उद्यापासून पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
राज्य सरकारने ५ ऑक्टोबरला यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, एल निनोचा प्रभाव ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात पावसावर आणि धरणांतील पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सरकारने आतापासूनच पाणी बचतीचे उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी मुंबई महापालिकेकडून बेलापूर ते ऐरोली आणि दिघा परिसरात दररोज सुमारे ४७० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराचा एकूण दैनंदिन पाणीपुरवठा सुमारे ५०० एमएलडी आहे. याशिवाय पनवेल परिसरातील लगतची गावे आणि सिडकोच्या विविध वसाहतींना दररोज ७४ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून दिघा आणि ऐरोली परिसराला ६२ एमएलडी पाणी मिळते. त्याचा लाभ महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या १४ गावांनाही होतो.
आठवड्यातून एक दिवस पाणी बंद
१० टक्के पाणीकपातीची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागातील एका प्रभागाचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे संबंधित प्रभागांतील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागेल. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
मोरबे धरणात ७१ टक्के साठा
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या ७१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धरणाची पाणीपातळी ८५ मीटर असून, उपलब्ध साठा १५ जुलै २०२७ पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा असला, तरी भविष्यातील संभाव्य टंचाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपात लागू केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.