शाळा प्रवेशासाठी बालवाटिका ते पहिलीपर्यंतचे वय निश्चित;

शाळा प्रवेशासाठी बालवाटिका ते पहिलीपर्यंतचे वय निश्चित;
Published on: 

बालवाटिका ते पहिलीपर्यंतचे वय निश्चित
राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांना आता एकच नियम
मुंबई, ता. १५ : शालेय शिक्षण विभागाने पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी मुलांचे किमान वय निश्चित केले आहे. यानुसार बालवाटिका-१ किंवा नर्सरीसाठी तीन वर्षे, बालवाटिका-२ अर्थात ज्युनियर केजीसाठी चार वर्षे, बालवाटिका-३ अर्थात सीनियर केजीसाठी पाच वर्षे, तर इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. या नव्या वयोमर्यादेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षी ३० जून हा वयाचा मानीव दिनांक राहणार आहे.
शाळा प्रवेशाच्या वयाबाबत राज्यातील विविध शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये असलेली तफावत दूर करणे, पूर्वप्राथमिक वर्गांसाठी वयाचे स्पष्ट निकष निश्चित करणे, सहा वर्षे पूर्ण झालेल्या बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्याची व्यवस्था निर्माण करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून बालवाटिका-१ किंवा नर्सरीमध्ये प्रवेशासाठी बालकाचे वय ३० जूनला किमान तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल. त्यानंतर २०२८-२९ पासून बालवाटिका-२ किंवा ज्युनियर केजीसाठी चार वर्षे, २०२९-३० पासून बालवाटिका-३ किंवा सीनियर केजीसाठी पाच वर्षे आणि २०३०-३१ पासून इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे किमान वयाची अट लागू होईल. या निर्णयामुळे पूर्वप्राथमिकच्या तीन वर्षांच्या शिक्षणापासून ते इयत्ता पहिलीपर्यंत मुलांचे वय क्रमाने निश्चित होणार आहे. परिणामी, पहिलीत प्रवेश घेताना वयाची अट पूर्ण करण्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आधीच्या वर्गांपासूनच नियोजनबद्ध प्रवेशप्रक्रिया राबवता येणार आहे.

असा वयोमर्यादेचा नवा नियम
बालवाटिका-१ / नर्सरी : किमान वय ३ वर्षे - शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून.
बालवाटिका-२ / ज्युनियर केजी : किमान वय ४ वर्षे - शैक्षणिक वर्ष २०२८-२९ पासून.
बालवाटिका-३ / सीनियर केजी : किमान वय ५ वर्षे - शैक्षणिक वर्ष २०२९-३० पासून.
इयत्ता पहिली : किमान वय ६ वर्षे - शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पासून.
सर्व वर्गांसाठी वयाची गणना संबंधित प्रवेशवर्षाच्या ३० जूनला केली जाणार आहे.

२०२६-२७ मधील विद्यार्थ्यांना दिलासा
नव्या वयोमर्यादेमुळे सध्या शाळेत शिकत असलेल्या मुलांच्या प्रवेशावर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने महत्त्वाची तरतूद केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नर्सरी ते इयत्ता पहिलीमध्ये आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हे नवीन वयोमर्यादेचे निकष लागू होणार नाहीत. त्यामुळे विद्यमान विद्यार्थ्यांना नव्या नियमांमुळे अडचण येणार नाही. तसेच, पूर्वप्राथमिक वर्गांपासून इयत्ता पहिलीपर्यंत प्रवेश देताना शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वयाच्या निकषांमध्ये १५ दिवसांची सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

एनईपीच्या पायाभूत शिक्षण रचनेनुसार निर्णय
एनइपीनुसार पूर्वप्राथमिक शिक्षणापासून इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी वयोमर्यादेचे सुसंगत नियोजन आवश्यक आहे. यापूर्वी राज्यात राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी वेगवेगळे वयाचे निकष आणि वय मोजण्याच्या तारखा वापरल्या जात होत्या. तसेच, पूर्वप्राथमिक वर्गांसाठीही एकसमान वयोमर्यादा निश्चित नव्हती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता बालवाटिका, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयाचे निकष निश्चित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com