

सार्वजनिक ठिकाणी वर्षभर फटाकेबंदी
उच्च न्यायालयाचे आदेश; दिवाळीसह सर्व सण-उत्सवांना लागू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : सण-उत्सवांच्या नावाखाली फटाके फोडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यास परवानगी देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. १५) स्पष्ट केले आणि सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास बंदी घातली. ही बंदी वर्षभरातील सर्व सणांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला लागू असल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. त्याच वेळी रुग्णालये, शाळा, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरातील शांतता क्षेत्रांतही फटाके फोडण्यास पूर्ण प्रतिबंध घालण्यात आला आहे.
ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भातील प्रश्नांची गंभीर दखल घेऊन न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान फटाक्यांच्या धुरामुळे आणि विषारी घटकांमुळे आधीच प्रदूषित शहरांतील हवेची गुणवत्ता आणखी खालावत असल्याबद्दल न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली.
मुंबईतील काही भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४२५ पर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच हवेची ही स्थिती असेल, तर फटाक्यांमुळे होणाऱ्या अतिरिक्त प्रदूषणाचे परिणाम किती गंभीर असतील, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरांत पावसाळ्यानंतर धुरके आणि धुराचा थर कायम असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
...
हक्कांचे उल्लंघन नको
फटाके फोडणे उत्सव साजरा करण्याचा मार्ग असू शकतो; मात्र त्यासाठी समाजाला आरोग्याची किंमत मोजावी लागता कामा नये, असेही न्यायालयाने बजावले. ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि परीक्षांर्थ्यांना होतो. काहींच्या बेफिकिरी इतरांच्या शांततेत जगण्याच्या आणि स्वच्छ हवेत श्वास घेण्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
...
आठवडाभरात जनजागृती
राज्य सरकार, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आठवडाभरात फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती यंत्रणा उभारावी, असे आदेश न्यायालयाने दिले. शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांवरून आवाहन तसेच बस, बसथांबे, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी संदेश प्रदर्शित करण्याचे आदेश न्यायालयाने आले. हरित फटाक्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासह नियमांनुसार निर्धारित वेळेतच फटाके फोडण्याबाबत नागरिकांना जागरूक करण्याचे तसेच जनजागृती मोहिमेत सेलिब्रिटींना सहभागी करून घेण्याचेही न्यायालयाने आदेशात सुचवले आहे.
...
नियम कागदावर नकोत
ध्वनिप्रदूषणाचे नियम केवळ कागदावर राहता कामा नयेत. तक्रार आल्यानंतरच कारवाई करण्याऐवजी नियमभंग रोखण्यासाठी आधीपासून सक्षम प्रतिबंधात्मक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. फटाक्यांच्या विक्रीवर संपूर्ण बंदी नाही, प्रदूषण रोखण्यासाठी कायद्यानुसार त्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे हा उद्देश असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.