नवी मुंबईकरांना दिलासा!

नवी मुंबईकरांना दिलासा!
Published on: 

नवी मुंबईकरांना दिलासा!
शहरात पाणीकपात नाही; गणेश नाईक यांची ग्वाही
वाशी, ता. १६ (बातमीदार) : मोरबे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे नवी मुंबईत पाणीकपात लागू होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, वनमंत्री गणेश नाईक यांनी शहरात कोणत्याही प्रकारची पाणीकपात होणार नसल्याचे स्पष्ट करीत नवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. गुरुवारी (ता. १५) आयोजित जनता दरबारात त्यांनी ही ग्वाही दिली आणि महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठ्याबाबत ठोस भूमिका घेण्याचे कडक निर्देश दिले. त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे असतानाही पूर्वीच्या प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात न घेता अन्य शहरांना पाणीपुरवठा केल्याचा मुद्दा गणेश नाईक यांनी उपस्थित केला. नवी मुंबईकरांवर पाणीकपातीची वेळ आणू नये, असे स्पष्ट करीत त्यांनी आयुक्त आणि शहर अभियंत्यांशी चर्चा केली. शहरात पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतल्यास नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

५० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार
आयुक्त आणि तांत्रिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारवी धरणासह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांत नवी मुंबईला ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भविष्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याने सध्या पाणीकपात करण्याची गरज नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखा!
उद्यानांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्यावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले. पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नवी मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले असून, ते पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. महापालिका म्हणजे केवळ आयुक्त नव्हे, तर महासभाही महत्त्वाची आहे, असे सांगत नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, असे निर्देश गणेश नाईक यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com