

उल्हासनगरमधील वीज समस्यांवर तोडगा
तांत्रिक अडचणी दूर करण्यासह शिबिरे घेण्याचा निर्णय
उल्हासनगर, ता. १५ (बातमीदार) : वारंवार होणारी वीजकपात, उद्याने व रस्त्यांवरील पथदिवे अचानक बंद पडणे आणि पाणीपुरवठ्याच्या वेळेत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे उल्हासनगरमधील नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी नुकतीच जनसंपर्क कार्यालयात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करणे, नवीन रोहित्र बसविणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता देवाशीष दत्ता, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, नगरसेवक आणि महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांच्या वतीने सच्चानंद गोपलानी आणि मेघराज लुंड यांनी व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. वीजकपातीची पूर्वसूचना व्यापाऱ्यांना व्हॉट्सॲप समूहाद्वारे देण्याची मागणीही करण्यात आली.
रोहित्रांसह वीजवाहिन्यांमध्ये सुधारणा
शहरातील वीजपुरवठ्याच्या समस्यांमागे वितरण रोहित्र केंद्राशी संबंधित (डीटीसी) यंत्रणेतील तांत्रिक अडचणी असल्याचे अधीक्षक अभियंता देवाशीष दत्ता यांनी सांगितले. नवीन रोहित्र बसविताना त्याच्या क्षमतेनुसार संबंधित वीजवाहिन्या आणि आवश्यक उपकरणेही बदलण्यात येणार आहेत. तसेच उच्चदाब आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या एकत्र असल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्या स्वतंत्र करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. उद्याने आणि रस्त्यांवरील पथदिवे निर्धारित वेळेपूर्वीच बंद पडत असल्याच्या तक्रारीही मांडण्यात आल्या. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
तीन ठिकाणी तक्रार निवारण शिबिरे
वीजग्राहकांना तक्रारींसाठी वारंवार कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी तीन ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या शिबिरांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर निराकरण करण्याचे नियोजन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.