

पावसाअभावी शेतकरी संकटात
भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
वज्रेश्वरी, ता. १६ (बातमीदार) : पावसाअभावी भातपिकांचे नुकसान झाल्याने भिवंडी तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून बांधावरच पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिजाऊ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यंदा भिवंडी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी भातशेतीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती, मात्र पावसाअभावी पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. मशागत, बियाणे, खते आणि अन्य खर्च करूनही अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
जिजाऊ संघटनेच्या महाराष्ट्र विभागातील भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख मोनिकाताई पानवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि विविध गटप्रमुख या वेळी उपस्थित होते. आता प्रशासनाकडून पंचनामे कधी केले जातात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तहसीलदारांना निवेदन
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिजाऊ संघटनेच्या वतीने भिवंडीचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करावी, जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली. प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.