

आदिवासीवाड्यांना मूलभूत सुविधा
पालिकेने दिलेला शब्द पाळला; रस्ता, पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही
नवीन पनवेल, ता. १६ (बातमीदार) : पनवेल महापालिका हद्दीतील टेंभोडे येथील वाघऱ्याची वाडी आणि वळवली येथील सागवाडीमधील आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधांसाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. उपोषणादरम्यान आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तात्पुरत्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, पिण्याच्या पाण्यासाठीही उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
१ ऑक्टोबर रोजी संतोष चाळके, परेश लोंढे, निर्गुडा, दामू यांच्यासह आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने दखल घेत चर्चा केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. त्यानंतर वाड्यांमध्ये ये-जा करण्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला. विहिरींना पंप जोडून फिल्टर आणि आरओ प्लांटच्या माध्यमातून स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
आयुक्तांच्या निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधवांसोबत परिसराची पाहणी केली. नकाशे आणि मॅपिंगची माहिती तपासून आवश्यक तपशील संकलित करण्यात आला. कायमस्वरूपी रस्त्यासाठी अंतिम प्रस्ताव वन विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. याशिवाय वाघऱ्याची वाडी परिसरात साफसफाईही करण्यात आली.
प्रश्नांसाठी लढा सुरूच
वंचित आणि शोषित घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू. आमच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही सुरू केल्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांचे आभार, अशी प्रतिक्रिया जनहक्क अधिकार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष चाळके यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.