शहापुरात दूध संकलन बंद

शहापुरात दूध संकलन बंद
Published on: 

शहापूर, ता. १८ (वार्ताहर) : पशुखाद्य, चारा आणि पशुपालनाचा वाढता खर्च यामुळे दुग्धव्यवसाय तोट्यात जात असल्याचे सांगत शहापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारपासून (ता. १७) बेमुदत संप पुकारला आहे. दूध खरेदीदरात समाधानकारक वाढ करावी, या मागणीसाठी दूध उत्पादकांनी डेअरी मालकांना दूध न देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदारांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाढत्या महागाईमुळे पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर वाढल्याने सध्या दुग्ध व्यवसाय तोट्यात चालला आहे. दुभत्या गायी-म्हशींच्या खरेदीसह त्यांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत दूध खरेदीदरात वाढ होत नसल्याने उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रश्नात लक्ष घालून दूध उत्पादक आणि डेअरी मालक यांच्यात समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत डेअरी मालक दुधाचे खरेदी दर वाढवून देत नाहीत आणि हा मनमानी कारभार थांबवत नाहीत, तोपर्यंत एक थेंबही दूध डेअरीला दिले जाणार नाही. प्रशासनाने यामध्ये तातडीने मध्यस्थी करावी, अन्यथा हे शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन भविष्यात अधिक तीव्र केले जाईल, असे दूध उत्पादक सांगितले.

वाढत्या खर्चाने दुग्धव्यवसाय तोट्यात
शहापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील कुटुंबांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, वैरण आणि खुराक यांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यासोबतच दुभत्या म्हशी व गायींच्या खरेदीच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. एकीकडे पशूंचा सांभाळ करण्याचा खर्च दुप्पट झाला असताना, दुसरीकडे मात्र दूध डेअरी मालकांकडून दुधाचे खरेदी दर वाढवण्यास स्पष्ट नकार दिला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना हा धंदा पदरमोड करून तोट्यात चालवावा लागत आहे, ज्यामुळे तीव्र असंतोष आणि निराशा पसरली आहे.

जोपर्यंत डेअरी मालक दुधाच्या दरामध्ये समाधानकारक वाढ करत नाहीत, तोपर्यंत तालुक्यातील कोणतीही डेअरी सुरू होऊ दिली जाणार नाही. हा संप शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने सुरू करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न करता शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहणार आहे. प्रशासनाने या संपाची दखल घेऊन योग्य ते सहकार्य करावे.
- मारुती धिर्डे, अध्यक्ष, दूध उत्पादक शेतकरी सामाजिक संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com