स्टेप लाइन : बालआरोग्य, कुटुंब नियोजनाच्या कामाचा आढावा घेताना त्रुटी; विभागीय चौकशीचे आदेश

स्टेप लाइन :
बालआरोग्य, कुटुंब नियोजनाच्या कामाचा आढावा घेताना त्रुटी; विभागीय चौकशीचे आदेश
Published on: 

दोन अधिकारी निलंबित
आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत हलगर्जीचा ठपका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : बाल आरोग्य आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर अपेक्षित नियंत्रण व देखरेख न ठेवल्याचे आढळल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने पुणे येथील आरोग्यसेवा (कुटुंबकल्याण) विभागातील दोन सहाय्यक संचालकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. डॉ. राजकुमार जगताप आणि डॉ. राजश्री गजानन ढवळे, अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या कामकाजाची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी १२ ऑक्टोबरला घेतलेल्या आढाव्यात संबंधित कार्यक्रमांच्या कामकाजातील अनेक त्रुटी समोर आल्या. क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष भेटी न देणे, कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर आवश्यक पर्यवेक्षण न करणे तसेच सद्यःस्थितीबाबत समाधानकारक माहिती सादर न करणे, असे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. डॉ. जगताप यांच्याकडे बाल आरोग्य कार्यक्रमाची, तर डॉ. ढवळे यांच्याकडे कुटुंब नियोजन कार्यक्रमाची जबाबदारी होती. या दोन्ही महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांच्या कामकाजात अपेक्षित गांभीर्य न दाखविल्याचे आढाव्यात निदर्शनास आले. त्यानंतर शासनाने दोन्ही अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यालय
सार्वजनिक आरोग्य विभागाने १३ ऑक्टोबरला निलंबनाचे आदेश काढले. निलंबनाच्या कालावधीत दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथील सामान्य रुग्णालयात निश्चित करण्यात आले आहे. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नसून, निलंबन काळात खासगी नोकरी, व्यापार किंवा उद्योगात सहभागी होण्यासही मनाई करण्यात आली आहे.

लातूरचा अतिरिक्त कार्यभार साळुंके यांच्याकडे
लातूर मंडळाच्या उपसंचालकपदाची जबाबदारी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार मधुकर साळुंके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. रेखा नाखवडे (गायकवाड) यांना १२ ऑक्टोबरला कार्यमुक्त करण्यात आल्याने पद रिक्त झाले होते. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत साळुंके हे बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदाची जबाबदारी सांभाळून लातूर मंडळाच्या उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही पाहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com