

मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ
मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यात मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना तसेच नवमतदारांना नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) उपक्रमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
मतदारांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील निश्चित मतदान केंद्रांवर १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. शनिवार व रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही शिबिरे सुरू राहतील. या मोहिमेत महिला आणि दिव्यांग नागरिकांच्या नावनोंदणीला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनाही नाव नोंदवता येणार आहे.
शिबिरांमध्ये आवश्यक घोषणापत्रे आणि पुराव्यांसह अर्ज सादर करता येतील. मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नाव वगळण्यासाठी नमुना ७, तर नाव किंवा इतर नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ उपलब्ध करून दिला जाणार आहे. या वेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार असून, राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनाही (बीएलए) उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदार यादीतील नावांबाबत दावे व हरकती २६ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येणार आहेत. मुदतवाढ देण्यात आली असली, तरी अंतिम मतदार यादी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.