

मोरबे धरण हस्तांतरणाची मागणी
विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा; दुरुस्ती आणि पाणीपुरवठ्याच्या व्यवहार्यतेसाठी तांत्रिक सर्वेक्षणाची मागणी
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पनवेल तालुक्यातील मोरबे गावाजवळील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील धरणाची दुरुस्ती करून ते पनवेल महापालिकेकडे वर्ग करावे, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागाकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला असून, धरणाची तांत्रिक तपासणी करून त्यातील पाण्याचा वापर महापालिका क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यासाठी करण्याची व्यवहार्यता तपासण्याची मागणी केली आहे.
अरविंद म्हात्रे यांनी १६ ऑक्टोबर रोजी धरण क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या वेळी महापालिकेचे नगरसेवकही उपस्थित होते. त्यांच्या पत्रानुसार, हे धरण सुमारे ३६४ हेक्टर क्षेत्रात पसरलेले असून, त्याची पाणी साठवण क्षमता तीन हजार ५५६ दशलक्ष लिटर आहे. सध्या या धरणातील पाण्याचा वापर टँकरचालक, बांधकाम व्यावसायिक आणि फार्महाउसधारक करीत असल्याचे म्हात्रे यांनी नमूद केले आहे.
पनवेल शहर आणि परिसरातील नागरी वसाहतींचा विस्तार वेगाने होत असल्याने पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. मोरबे धरणाचा पुनर्वापर केल्यास महापालिकेला पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी जलस्रोत उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे धरणाच्या दुरुस्तीचा आणि हस्तांतरणाचा प्रस्ताव शासन स्तरावर तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
संयुक्त तांत्रिक सर्वेक्षणाची मागणी
मोरबे धरणाची सद्यःस्थिती, पाणी साठवण क्षमता, संभाव्य गळती, गाळाचे प्रमाण आणि दुरुस्तीसाठी लागणारा खर्च यांची सविस्तर तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच धरणातील पाण्याची गुणवत्ता तपासून ते पनवेल महापालिका क्षेत्रात पुरविण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याची व्यवहार्यता निश्चित करावी. यासाठी पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त पथकाद्वारे प्रत्यक्ष पाहणी व तांत्रिक सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार धरणाच्या दुरुस्तीचा आणि हस्तांतरणाचा निर्णय घेऊन भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका अरविंद म्हात्रे यांनी मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.