लॉजिस्टिक अन् शिपिंग क्षेत्रातील ''उज्वला''ची गगनभरारी

लॉजिस्टिक अन् शिपिंग क्षेत्रातील ''उज्वला''ची गगनभरारी
Published on: 

लॉजिस्टिक अन् शिपिंग क्षेत्रातील ‘उज्वला’ची गगनभरारी
पुरुषांच्या मक्तेदारीला छेद देत ठरल्या यशस्वी
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : नवरात्रोत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने व जिद्दीने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे. प्रामुख्याने पुरुषांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या शिपिंग, लॉजिस्टिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात गेल्या १६ वर्षांपासून यशस्वी वाटचाल करणाऱ्या उज्वला पातुरडे यांचा प्रवास इतर महिलांसाठी स्फूर्तिदायक ठरला आहे. कस्टम हाउस एजंट म्हणून ग्राउंड लेव्हलवरून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज मुंबई, मुंद्रा तसेच संपूर्ण पश्चिम आणि दक्षिण भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नेतृत्व करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे.
उज्वला या क्षेत्रात आल्या, तेव्हा त्यांनी एका कस्टम हाउस एजंट फर्ममध्ये काम सुरू केले. काम शिकत आणि कष्टाच्या जोरावर अनुभव घेत त्या टप्प्याटप्प्याने पुढे गेल्या. आज त्यांची कंपनी ऑल इंडिया तसेच जगभरात फॉरवर्डिंग आणि लॉजिस्टिक सेवा पुरवते. सुरुवातीच्या काळात या क्षेत्रात पुरुषांचेच वर्चस्व अधिक होते, परंतु गेल्या काही वर्षांत महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता कस्टम्स, शिपिंग लाइन, डॉक्युमेंटेशन आणि कम्युनिकेशन विभागांमध्ये महिला मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारात कस्टम क्लिअरन्स, फ्रेट फॉरवर्डिंग आणि डोअर-टू-डोअर डिलिव्हरी हे तीन मुख्य भाग असतात. शासनाची कडक परीक्षा उत्तीर्ण होऊन एफ-कार्ड लायसन्स मिळवणे आणि आयात-निर्यातदार व कस्टम अथॉरिटी यांच्यातील मुख्य दुवा म्हणून काम करणे, विविध शिपिंग लाइन्सशी समन्वय साधून कार्गो बुक करणे आणि तो सुरक्षितपणे इच्छित स्थळी पाठवणे तसेच वस्तू एका देशातून दुसऱ्या देशातील ग्राहकाच्या दारापर्यंत सुरक्षित पोहोचवणे या सर्व सेवा एकाच छताखाली देण्याचे काम त्या आणि त्यांची टीम अतिशय कौशल्याने पार पाडते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धाच्या काळात शिपिंग क्षेत्राला मोठा फटका बसतो. गल्फ आणि मिडल ईस्ट देशांशी होणारा व्यापार युद्धाच्या काळात प्रभावित होतो. कंटेनर्स अडकून पडतात, ज्यामुळे डिटेंशन आणि डेमरेज चार्जेस वाढतात. अशा कठीण काळातही व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी मार्ग काढणे हे मोठे आव्हान असते. तसेच, भारतातील लॉजिस्टिक सिस्टीम आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणखी सुलभता आणि पारदर्शकता आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. व्यापाराला चालना देण्यासाठी सरकारी पातळीवर सुलभ नियम आणि स्वतंत्र कॉरिडोअरसारखे निर्णय घेणे गरजेचे असल्याचे उज्वला यांचे मत आहे. उज्वला पातुरडे यांचे मूळ शिक्षण प्रिंटिंग इंजिनिअरिंगमध्ये झाले आहे. थॉमसन प्रेससारख्या मोठ्या संस्थेत प्रॉडक्शन लाइन आणि बुक्स एक्सपोर्ट सांभाळल्यानंतर त्यांनी लॉजिस्टिक क्षेत्रात पदार्पण केले.

लॉजिस्टिक्स आणि शिपिंग क्षेत्रात महिलांना संधी
भारतातून जगभरात पुस्तकांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते आणि चीननंतर भारत या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कामाच्या निमित्ताने त्यांनी युके, बँकॉक, टर्की आणि फिलिपाईन्स यांसारख्या देशांमधील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. लॉजिस्टिक्स आणि शिपिंग क्षेत्रात रोजगाराच्या व व्यवसायाच्या अफाट संधी असून, फक्त पुस्तकी ज्ञान न राहता प्रात्यक्षिक अनुभव घेणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे आले पाहिजे. तुमची जिद्द आणि आजूबाजूचे वातावरण सकारात्मक असेल, तर आकाशही तुमच्यासाठी ठेंगणे ठरेल, असा आत्मविश्वासपूर्ण संदेश उज्वला पातुरडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com