

वसई-विरारचा पाणीप्रश्न सुटणार!
मलनिस्सारण प्रकल्पांना गती; महासभेच्या मंजुरीकडे लक्ष
वसई, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरारमधील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासह सांडपाण्याचा निचरा सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन प्रमुख प्रकल्प हाती घेण्याची तयारी केली आहे. ‘अर्बन चॅलेंज फंड’ (यूसीएफ) अंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) हे प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, अशी शिफारस आयुक्तांनी महासभेकडे केली आहे.
आगामी २०२७-२८ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पांच्या खर्चासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष समाविष्ट करून आवश्यक आर्थिक तरतूद करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. महासभेची प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
वसई-विरारमधील अनेक भागांत अद्यापही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. काही ठिकाणी नळजोडण्यांचा अभाव, अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी पाणी वितरण व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे.
खोलसापाडा एक व दोन पाणीपुरवठा योजना तसेच तृतीयस्तरीय सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारीकरणासाठीही सल्लागार नेमण्यात येणार आहे.
नगररचना विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, २०५७ पर्यंत वसई-विरार क्षेत्राची लोकसंख्या ७०.५४ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी खोलसापाडा स्रोतावरून प्रतिदिन ७८ दशलक्ष लिटर क्षमतेची योजना प्रस्तावित आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, नालासोपारा पूर्वेतील एसटीपी झोन-३ येथे ४३१.२८ कोटी रुपयांची भुयारी गटार योजना आणि मलनिस्सारण केंद्र उभारण्याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. वाढते नागरीकरण आणि भविष्यातील पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेता हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. मात्र, प्रस्तावित योजनांना महासभेकडून मंजुरी मिळते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकट
भविष्यातील गरजांसाठी नियोजन
- २०५७ पर्यंत संभाव्य लोकसंख्या : ७०.५४ लाख
- खोलसापाडा स्रोतावरील प्रस्तावित पाणीपुरवठा : प्रतिदिन ७८ दशलक्ष लिटर
- नालासोपारा पूर्वेतील भुयारी गटार योजना : ४३१.२८ कोटी रुपये
चौकट
सल्लागार नियुक्तीचा मांडणार प्रस्ताव!
आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले वाढत्या नागरीकरणाचा विचार करून नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव महासभेसमोर मांडण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.