जेएनपीए ट्रस्टी निवडणूक रंगणार

जेएनपीए ट्रस्टी निवडणूक रंगणार
Published on: 

जेएनपीए ट्रस्टी निवडणूक रंगणार
ऑफिसर्स असोसिएशनलाही लढतीची संधी; १४ डिसेंबरला मतदान, कामगार संघटनांसमोर नवे आव्हान
उरण, ता. १९ (वार्ताहर) : जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदांसाठी १४ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीत प्रथमच ऑफिसर्स असोसिएशनलाही सहभागी होण्याची परवानगी मिळाल्याने निवडणुकीचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे ट्रस्टी पदांसाठीची लढत पंचरंगी आणि रंगतदार होण्याची शक्यता असून, विद्यमान कामगार संघटनांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
जेएनपीए प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये पहिली कामगार ट्रस्टी निवडणूक पार पडली होती. त्यानंतर दोन कामगार ट्रस्टींचा कार्यकाळ ३१ मार्च २०२६ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याची अपेक्षा होती, मात्र केंद्रीय कामगार आयुक्तांकडून मंजुरी न मिळाल्याने निवडणूक पाच ते सहा महिने रखडली होती.
दरम्यान, जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदांसाठी ९० दिवसांत निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या सचिव अनिता बिस्त यांनी मुंबईच्या मुख्य कामगार आयुक्तांना दिले होते. त्यामुळे दिवाळीपूर्वी निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर कामगार संघटना आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती, मात्र निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जेएनपीए ऑफिसर्स असोसिएशनने ट्रस्टी निवडणुकीत अधिकाऱ्यांनाही मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी केली होती. या मागणीवर निर्णय घेण्यासाठी मुंबईचे कामगार आयुक्त संजय डाबी यांनी १६ ऑक्टोबर रोजी जेएनपीएतील सर्व कामगार संघटनांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत उपस्थित कामगार संघटनांनी अधिकारी हे कामगारवर्गाचा भाग नसल्याचे सांगत ऑफिसर्स असोसिएशनच्या सहभागाला विरोध केला, मात्र नवीन प्राधिकरण कायद्यात ऑफिसर्स असोसिएशनलाही निवडणूक लढविण्याची तरतूद असल्याचे कामगार मंत्रालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कामगार संघटनांचा विरोध असतानाही असोसिएशनला निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात आली.
बैठकीतच निवडणुकीची तारीख जाहीर करण्यास काही कामगार संघटनांनी विरोध केल्याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली, मात्र कामगार आयुक्त संजय डाबी यांनी असोसिएशनला दिलेली परवानगी आणि निवडणुकीची घोषित तारीख यामुळे कामगार संघटनांचे राजकीय व संघटनात्मक गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संघटनांसमोर मतविभाजनाचे आव्हान
ऑफिसर्स असोसिएशनलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार असल्याने कामगार ट्रस्टी पदांसाठीची स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या नव्या समीकरणामुळे कामगार संघटनांना आपल्या मतदारांची एकजूट राखण्याबरोबरच निवडणूक रणनीतीतही बदल करावे लागू शकतात. त्यामुळे १४ डिसेंबरच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे जेएनपीए परिसरातील कामगारांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com