पूर्णेकर हत्याप्रकरणी टल्ली, पपलूला तीन दिवसांची पोलिस कोठडी

पूर्णेकर हत्याप्रकरणी टल्ली, पपलूला तीन दिवसांची पोलिस कोठडी
Published on: 

टल्ली, पपलूच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ
गुन्ह्यातील शस्त्रे, हेल्मेटचा शोध; तपासातील गोपनीय नोंदीने चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमितसिंग उर्फ पपलू यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली आहे. दोघांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. टल्ली आणि पपलू हे दोघे पोलिस कोठडीत होते. आरोपी तपासात सहकार्य करत नसून, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे तसेच घटनेवेळी परिधान केलेले कपडे आणि हेल्मेट शोधायचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपी जाणीवपूर्वक वेगवेगळी माहिती देऊन तपासाची दिशाभूल करत असल्याचा दावाही पोलिसांनी केला. त्यामुळे दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, तपासादरम्यान काही महत्त्वाची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. ही माहिती गोपनीय असल्याने तिचा तपशील सार्वजनिक करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या माहितीची नोंद असलेली पोलिस डायरी न्यायाधीश एस. बु. साबळे यांच्यासमोर सादर करण्यात आली. संबंधित नोंद न्यायाधीशांना वाचण्यासाठी देण्यात आली, मात्र त्यातील माहितीचा तपशील उघड करण्यात आला नाही. अखेर न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

नगरसेवकपदाच्या वादाचा मुद्दा न्यायालयात
पूर्णेकर यांच्या वकिलांनी नगरसेवकपदावरून झालेल्या वादातून हत्या झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रयागराज येथे आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना दिलेल्या माहितीतही याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावरून न्यायाधीशांसमोर पोलिस अधिकारी आणि वकिलांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यामुळे हत्येमागील नेमके कारण आणि तपासात समोर आलेल्या गोपनीय माहितीचे स्वरूप याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com