

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : मुंब्रा परिसरात हेवी डिपॉझिटवर खोली भाड्याने देण्याचे आणि गुंतवणुकीवर दरमहा तीन ते दहा हजार रुपये परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून २५ जणांची ५५ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी शबाना सज्जाद दांडेकर (वय ४७) या महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरताज सादिक बेग (वय ३६) यांनी याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शबाना हिने मालमत्ता व्यवहार प्रतिनिधी असल्याचे सांगून मुंब्रा परिसरात हेवी डिपॉझिटवर खोल्या देण्याची योजना राबवत असल्याचे भासवत होती. या योजनेत पैसे गुंतवल्यास खोली भाड्याने मिळेल आणि गुंतवणुकीच्या रकमेप्रमाणे दरमहा तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत परतावा मिळेल, असे आश्वासन देत होती. या प्रलोभनाला बळी पडून अनेकांनी तिला पैसे दिले.
काही नागरिकांना प्रत्यक्ष खोली दाखवून, तर काहींना खोली न दाखवताच पैसे स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय, धनादेश आणि रोख स्वरूपात व्यवहार करण्यात आले. २०२१ ते २०२७ या कालावधीसाठी भाडेकरार तयार केले. मात्र, संबंधित खोल्या प्रत्यक्ष ताब्यात न देता एकाच खोलीच्या नावाखाली वेगवेगळ्या व्यक्तींकडून वारंवार हेवी डिपॉझिट स्वीकारण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यातून एकूण ५५ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत. शबानाला १२ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा
हेवी डिपॉझिटवर खोली देण्याचे प्रलोभन दाखवून कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधित नागरिकांनी मुंब्रा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा योजनांमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी खोलीची मालकी, भाडेकरार आणि अन्य कायदेशीर बाबींची खातरजमा करावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.