

विसर्जित मूर्तींच्या मातीला नवे रूप!
‘विसर्जन ते सृजन’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाला चालना
बदलापूर, ता. २० (बातमीदार) : गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर उरणाऱ्या शाडू मातीला पुन्हा मूर्तीरूप देण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या वतीने राबविण्यात येत आहे. ‘विसर्जन ते सृजन’ या मोहिमेंतर्गत नवी मुंबईतून संकलित केलेली तब्बल १२ टन शाडू माती बदलापुरात आणण्यात आली आहे. या मातीवर पुनर्प्रक्रिया करून आगामी गणेशोत्सवासाठी नव्या मूर्ती घडविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होण्यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने सीबीडी बेलापूर येथील एनएमएमसी पार्किंग परिसरातून ही माती संकलित करण्यात आली. मातीचे प्राथमिक वर्गीकरण करून ती गोण्यांमध्ये भरण्यात आली. त्यानंतर सहा कामगारांच्या मदतीने ट्रकमधून ती बदलापुरात आणण्यात आली. पुण्यातील ‘पुनवर्तन’ संस्थेच्या प्रतिनिधी आणि जिल्हा पर्यावरण कृती समितीच्या सदस्या रोटे. रेखा सांखला यांनी या प्रक्रियेसाठी तांत्रिक मार्गदर्शन केले.
बदलापुरात आणलेली शाडू माती स्थानिक मूर्तिकारांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मूर्तिकार संतोष साबळे यांच्यासह अन्य मूर्तिकार मातीवर पुनर्प्रक्रिया करणार आहेत. त्यातील कृत्रिम साहित्य, तारा, तंतू आणि अन्य अशुद्ध घटक वेगळे करून माती गाळली जाणार आहे. त्यानंतर मूर्तीनिर्मितीसाठी योग्य बनविलेल्या मातीचा आगामी गणेशोत्सवात नव्या मूर्ती घडविण्यासाठी वापर करण्याचे नियोजन आहे. यामुळे विसर्जित मूर्तींमधील शाडू माती पुन्हा उपयोगात येईल आणि स्थानिक मूर्तिकारांनाही कच्चा माल उपलब्ध होईल.
विसर्जनानंतर मातीची विल्हेवाट लावण्याऐवजी तिचा पुनर्वापर करून नव्या मूर्ती घडविण्याची संकल्पना पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणारी आहे. महापालिका, रोटरी क्लब, पर्यावरण क्षेत्रातील संस्था आणि स्थानिक मूर्तिकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला हा उपक्रम पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
१२ रोटरी क्लबचा सहभाग
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२चे जिल्हा प्रांतपाल डॉ. नीलेश जयवंत यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले. नवी मुंबई आणि बदलापूरमधील १२ रोटरी क्लबनी या उपक्रमात सहभाग घेतला. रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरियाचे अध्यक्ष डॉ. अमोल उबाळे यांनी स्थानिक मूर्तिकारांशी समन्वय साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.