

नियमभंग करणाऱ्या रक्तपेढ्या बंद होणार
एसबीटीसीची सात दिवसांची मुदत; एनओसी रद्द करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : रक्ताची गुणवत्ता सुनिश्चित करणे, रक्तदात्यांचे हक्क जपणे आणि रक्तपेढ्यांच्या कामकाजात पारदर्शकता राखणे यासाठी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी) यांनी राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (नॅको) निर्धारित निकषांचे सात दिवसांत पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते. तसेच, संबंधित रक्तपेढ्या बंद करण्याचीही कारवाई होऊ शकते.
परिषदेने यासंदर्भात परिपत्रक जारी करून जिल्हा आणि प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना संबंधित रक्तपेढ्यांपर्यंत नोटीस पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन (एफडीए), केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) आणि रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करण्यात आले असले, तरी अनेक रक्तपेढ्यांकडून निर्धारित नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
रक्ताची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी रक्तपेढ्यांनी उपलब्ध साठा, रक्तप्रक्रिया आणि अतिरिक्त तपासण्यांसाठी आकारले जाणारे शुल्क यांची माहिती दर्शनी भागात स्पष्टपणे प्रदर्शित करावी. तसेच, वैद्यकीय उपकरणांचे अंशांकन, कर्मचाऱ्यांची माहिती आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनाची नोंद व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे.
रक्तसंकलन आणि गुणवत्तेवर भर
शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांतील रक्तपेढ्यांना दरवर्षी किमान २,००० युनिट रक्तसंकलन करणे आवश्यक आहे. महानगरांमधील रक्तपेढ्यांसाठी ही मर्यादा ३,००० युनिटांपेक्षा अधिक आहे. रक्तसंकलन हे १०० टक्के स्वेच्छेने आणि कोणतेही आर्थिक मोबदला न घेणाऱ्या निरोगी रक्तदात्यांकडून करणे बंधनकारक आहे. नव्याने सुरू होणाऱ्या रक्तपेढ्यांनी सुरुवातीपासूनच रक्तातील विविध घटक वेगळे करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त
थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ॲनिमिया तसेच वारंवार रक्त चढविण्याची गरज असलेल्या अन्य रक्तविकारांच्या रुग्णांना रक्त आणि त्याचे घटक मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. यासंदर्भातील मासिक अहवाल पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे सादर करावा लागणार आहे. ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देणारा फलकही रक्तपेढ्यांमध्ये लावणे आवश्यक आहे, जेणेकरून गरजू रुग्णांना या सुविधेची माहिती मिळू शकेल. रक्तपेढ्यांना ई-रक्तकोष किंवा शासनाने निर्धारित केलेल्या पोर्टलवर दररोजची माहिती नोंदवावी लागणार आहे. रक्तदान शिबिरांची नोंदणी, रक्तदात्यांचे तपशील आणि प्रमाणपत्रे जारी करण्याची प्रक्रिया निर्धारित पोर्टलद्वारे करणे आवश्यक असेल. नियमांचे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून, रक्ताची सुरक्षितता, गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.