

फार्महाउसमधील डीपीवरून वाद
विठ्ठलवाडीकरांचा विरोध; गावातच रोहित्र बसविण्याची मागणी, महावितरणकडून काम स्थगित
रोहा, ता. २० (बातमीदार) : गावासाठी मंजूर झालेली विद्युत रोहित्राची (डीपी) उभारणी खासगी फार्महाउसच्या आवारात करण्यात आल्याने विठ्ठलवाडी ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक देत या प्रकाराला विरोध केला. फार्महाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रोहित्र बसविण्याचा प्रयत्नही ग्रामस्थांनी हाणून पाडला. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरणने काम थांबविले असून, गावात जागा उपलब्ध झाल्यानंतरच रोहित्र उभारण्यात येणार आहे.
खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारशीनुसार, रोहे तालुक्यातील चिंचवली तर्फे अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे विठ्ठलवाडी गावासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नऊ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र या निधीतून उभारण्यात येणारे रोहित्र गावाच्या वेशीवरील एका खासगी फार्महाउसच्या आवारात बसविण्यात आले. शासकीय निधीतून मंजूर झालेली सुविधा खासगी जागेत का उभारण्यात आली, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
या प्रकाराची माहिती मिळताच विठ्ठलवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत महावितरण कार्यालय गाठले. ग्रामस्थांच्या विरोधानंतर रोहित्र हलविण्याचे काम हाती घेण्यात आले, मात्र ते गावात न बसविता फार्महाऊसच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभारण्यास ठेकेदाराने सुरुवात केली. ही बाब समजताच महिला मंडळ, तरुण आणि ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी धाव घेत काम बंद पाडले. रोहित्र गावातच बसविण्यात यावे, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
या प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांनी भाजपचे नेते तथा माजी आमदार पंडितशेठ पाटील यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील आणि आस्वाद पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याची माहिती भाजपचे युवा कार्यकर्ते बिनधास्त धनावडे यांनी दिली.
या वेळी रमेश कदम, नारायण शिंदे, दिलीप गायकवाड, भास्कर चोरगे, शशिकांत निंबाळकर, शंकर वांद्रे यांच्यासह महिला मंडळातील सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जागा मिळताच उभारणी
विद्युत रोहित्र उभारणीच्या कामाला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी मिळाली आहे. गावात जागा उपलब्ध नसल्याने फार्महाउसच्या बाहेर रोहित्र उभारण्याचे नियोजन होते. सध्या काम थांबविण्यात आले असून, गावात जागा उपलब्ध झाल्यानंतर तातडीने उभारणीचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती महावितरण कंपनीचे रोहा येथील उपअभियंता जतीन पाटील यांनी दिली.
फोटो कॅप्शन: शासनाने गावासाठी मंजूर केलेली डीपी खासगी फार्महाउसच्या आवारात लावण्यात येणार असल्याने या गोष्टीला विरोध करताना संतप्त विठ्ठलवाडी ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.