पनवेलमध्ये अतिक्रमणविरोधी धडाका

पनवेलमध्ये अतिक्रमणविरोधी धडाका
Published on: 

पनवेलमध्ये अतिक्रमणविरोधी धडाका
फळविक्रेत्यांचे साहित्य जप्त; हातगाड्यांवरही कारवाई, बॅनरधारकांवर कारवाईची मागणी
पनवेल, ता. २० (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग दिला आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार विविध प्रभागांत अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या आणि पदपथांवरील साहित्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, सार्वजनिक जागा मोकळ्या होण्यास मदत होत आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रभाग समिती ‘क’, ‘ब’ आणि ‘ड’ अंतर्गत विविध ठिकाणी कारवाई केली. प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत खारघर सेक्टर २१ मधील व्हिस्टा कॉर्नर परिसरात अनधिकृत फळविक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या अनधिकृत हातगाड्या जप्त करून काही हातगाड्या तोडण्यात आल्या.
कामोठे सेक्टर ११ मधील ॲक्सिस बँकेसमोरील पदपथावर ठेवलेले अतिक्रमित साहित्यही जप्त करण्यात आले. त्यामुळे हा पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला. पदपथांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अशा कारवायांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत खारघर सेक्टर १३ मधील रस्त्यावरील अनधिकृत फळविक्रेत्यांवर कारवाई करून पादचारी मार्ग मोकळे करण्यात आले, तर प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत नवीन पनवेल परिसरात रस्त्यावर विविध वस्तूंची अनधिकृत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येणे आणि सार्वजनिक जागांचा नागरिकांना वापर करता येणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, टपऱ्या आणि शेड उभारणाऱ्यांविरोधातही दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

विनापरवाना बॅनरधारकांवर कारवाई कधी?
पनवेल शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असताना विनापरवाना बॅनर आणि फ्लेक्स लावणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विविध राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले जातात, मात्र कार्यक्रमाचा उद्देश पूर्ण झाल्यानंतरही हे बॅनर तसेच राहतात, असा आरोप नागरिक करत आहेत.
अनधिकृत बॅनरमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असून, जाहिरात शुल्काच्या माध्यमातून महापालिकेला मिळणाऱ्या महसुलाचेही नुकसान होत आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी मोहिमेप्रमाणेच विनापरवाना बॅनर आणि फ्लेक्स हटवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्याचे आवाहन
पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवणे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे आणि शहराचे सौंदर्य टिकून राहावे, यासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही सार्वजनिक जागांवर अतिक्रमण न करता महापालिकेला सहकार्य करावे.
— नितीन पाटील, महापौर, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com