

पोलिस दलाला ‘ड्रायव्हिंग’ची भेट
ठाण्यात दसऱ्याला राज्यातील चौथे प्रशिक्षण केंद्र सुरू
पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासह वाहन परवाना देण्यासाठी ठाणे शहर पोलिस दलाने दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतंत्र ‘पोलिस चालक प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले आहे. मुंबई, पुणे आणि दौंड येथील केंद्रांनंतर महाराष्ट्रातील हे चौथे प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. त्यामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना वाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
ठाण्याच्या पोलिस दलात वाहनचालकांची कमतरता असल्याने काही काळापासून होमगार्डची तात्पुरत्या स्वरूपात चालक म्हणून नियुक्ती केली जात आहे. पहिल्या टप्प्यात ५५ होमगार्ड उपलब्ध झाले आहेत, मात्र पोलिसांची वाहने हाताळण्यासाठी कौशल्य आणि अनुभव असणे गरजेचे असल्याने स्वतंत्र प्रशिक्षण केंद्राची संकल्पना पुढे आली. ठाणे शहर मोटार परिवहन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नासिर पठाण यांनी ही संकल्पना मांडली. शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही त्याला पाठबळ दिले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या आवश्यक परवानग्या घेऊन ठाण्यात हे केंद्र उभारण्यात आले. केंद्रात प्रशिक्षणासाठी दोन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रशिक्षणासोबतच वाहनाचा परवाना मिळविण्याची सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
---------------
चार प्रशिक्षकांची नियुक्ती
वाहनांचे प्रशिक्षण देण्यासाठी चार प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन माजी सैनिकांचा समावेश असून, ते सध्या पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत आणखी एका पोलिस कॉन्स्टेबलचीही प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-----
मुंबईतील प्रशिक्षण केंद्राचा अनुभव ठाण्यातील केंद्र उभारण्यासाठी उपयुक्त ठरला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे सहकार्य यामुळे केंद्र सुरू करण्यात यश आले. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि परवाना मिळविण्याची सुविधा यामुळे पोलिस दलातील चालकांची गरज भागविण्यास मदत होणार आहे. या केंद्रामुळे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकासाची नवी वाट खुली झाली आहे.
- नासिर पठाण, सहाय्यक पोलिस आयुक्त, ठाणे शहर (मोटार विभाग)