ठाण्यात लालपरीच्या जागांवर क्लस्टरचे काम सुरू

ठाण्यात लालपरीच्या जागांवर क्लस्टरचे काम सुरू
Published on: 

लालपरीच्या जागांवर क्लस्टरचे काम सुरू
खोपट, कळवा, वंदना आगारांत पुनर्विकास; एसटीच्या जागा जाणार असल्याने वाहतुकीच्या भवितव्याचा प्रश्न

ठाणे शहर, ता. २० (बातमीदार) : ठाणेकरांच्या सेवेत सहा दशकांहून अधिक काळ धावणाऱ्या एसटीच्या लालपरीला आता स्वतःच्याच हक्काच्या जागा सोडण्याची वेळ आली आहे. शहरातील खोपट, कळवा आणि वंदना येथील मोक्याच्या एसटी आगारांच्या जमिनीवर क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विविध जिल्ह्यांसह परराज्यांतही ठाण्यातून प्रवासी वाहतूक केली जाते. सहा दशकांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या एसटीच्या प्रवासात आता या जागांवर पुनर्विकासाचे संकट उभे राहिले आहे. ठाण्यातील विविध भागांतील अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी या जागांवर पक्की घरे बांधण्याचे नियोजन आहे.

खोपट आगार क्रमांक एक आणि दोन येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. खोपट आगार क्रमांक एकमधील सुमारे ५०० झाडे तोडण्यात आली असून, परिसरात पत्र्यांची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. या जागेवर क्लस्टर योजनेतून रहिवाशांसाठी नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. आगारातील शौचालय आणि बस धुण्याचे केंद्रही तोडण्यात आले आहे. त्यामुळे आगारात उभ्या राहणाऱ्या बस आता बाहेर उभ्या केल्या जात आहेत.

कळवा येथील एसटी विभागाच्या कार्यशाळेची जागाही क्लस्टर योजनेसाठी ताब्यात घेतली जात आहे. तेथे रहिवासी संकुलासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. वंदना एसटी स्थानकाजवळील एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांची वसाहत आणि ठाणे जिल्हा कार्यालयाची इमारतही पाडून त्या जागेवर क्लस्टर योजनेअंतर्गत इमारती उभारण्याचे नियोजन आहे. खोपट आगार क्रमांक दोनच्या जागेवरही क्लस्टरसाठी पत्र्यांचे कुंपण उभारून काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत ठाणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, एसटीच्या जागेवर क्लस्टरसाठी सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
-------------
‘एसटीच्या जागा देण्यास विरोध’
एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागा हीच महामंडळाची मोठी संपत्ती असल्याचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. ‘‘अनेक ठिकाणी रसवंतीगृहे आणि भेळ विक्रेत्यांचे स्टॉल ४० ते ५० वर्षे जागा खाली करत नाहीत. ठाण्यात मात्र एसटीचा सुमारे साडेपाच एकरांचा भूखंड क्लस्टरच्या नावाखाली घेतला जात आहे. त्याबदल्यात मोक्याचा भूखंड घेऊन एसटीला अडगळीत टाकले जात असून, महामंडळावर अन्याय होत आहे, एसटी महामंडळाने या निर्णयाला विरोध केला पाहिजे. जागांची अदलाबदल करण्यास महामंडळाने विरोध करावा; अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशी नोटीस सरकारला सोमवारीच बजावली आहे,’’ असेही शिंदे यांनी सांगितले.

छायाचित्र ओळ : खोपट आगारात क्लस्टर योजनेअंतर्गत रहिवासी इमारतींच्या उभारणीचे काम सुरू आहे. वंदना येथील विभागीय कार्यालयाच्या जागेवरही सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com