शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
Published on: 

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
एकनाथ शिंदेंची दसरा मेळाव्यात ग्वाही; ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असून, अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे त्यांची पिके करपली आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहणार असून, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. २०) गोरेगावस्थित नेस्को सेंटर येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिली.
सध्या राज्यात शेतकऱ्यांवर भीषण नैसर्गिक आपत्ती आली असून ही वेळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करण्याची नसून, शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची आहे. आम्ही केवळ भाषणे देणार नाही तर शेतकऱ्यांना रेशनही देऊ, असे सांगत शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांचे दुःख मला माहिती आहे. बांधावर पाहणी करण्यासाठी गेलो असताना शेतकरी ढसाढसा रडत होते. आज शेतकरी अश्रू ढाळत असताना विरोधक मुंबईत मोर्चे काढत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारीही शिवसेना घेईल. शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देऊन काय होणार, अशी टीका करणाऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांना बिस्किटाचा पुडा तरी दिला का, असा सवालही शिंदे यांनी विरोधकांना विचारला. ट्रक भरून मदत पाठवण्यासाठी मोठे मन लागते, असा टोलाही त्यांनी लगावला.
...
कर्जमाफीसाठी ३२ हजार कोटींचे नियोजन
मुख्यमंत्री असताना सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केल्याची आठवण करून देताना, आता कर्जमाफीसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे नियोजन केल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार दोघेही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. माझ्या लंडन दौऱ्यावरून विरोधकांना पोटदुखी झाली; मात्र मला त्याची फिकीर नसून कामातून त्यांना उत्तर देणार आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
...
मतचोरीच्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा
मतचोरीचे खोटे नॅरेटिव्ह पसरवले जात असून, विरोधक संवैधानिक संस्थांविरोधात मोर्चे काढून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. इंडिया आघाडीचा उल्लेख ‘दहा तोंडांचा रावण’ असा करताना, तरुणांची माथी भडकवण्याचे प्रयत्न थांबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ‘भारत हा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही; हिंदुस्तान आहे. देश जाळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा त्यांनी दिला.

Marathi News Esakal
www.esakal.com