

दसऱ्याला १२ तास बत्ती गुल
६० गावांतील ग्रामस्थांचा सण अंधारात
मुरबाड, ता. २१ (बातमीदार) : दसऱ्याच्या सणादिवशीच मुरबाड तालुक्यातील टोकावडे आणि धसई परिसरातील सुमारे ६० गावांचा वीजपुरवठा तब्बल १२ तास खंडित झाल्याने ग्रामस्थांना अंधारात सण साजरा करावा लागला. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी ६च्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास पूर्ववत झाला. सणाच्या दिवशी वीज नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून, महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
महावितरणच्या धसई कार्यालयाने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर याबाबत सूचना प्रसिद्ध केली होती. मुरबाड येथील उमरोली २२ केव्ही फिडरच्या इनकमर उच्चदाब वाहिनीच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे या सूचनेत नमूद करण्यात आले होते. तसेच चार तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असेही कळविण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात दुरुस्तीला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागल्याने ग्रामस्थांना तब्बल १२ तास विजेविना राहावे लागले.
दसरा हा सण साजरा करण्यासाठी घरोघरी तयारी सुरू असताना अचानक वीज गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सणाच्या दिवशी घरातील विद्युत उपकरणे बंद पडण्याबरोबरच इतर दैनंदिन कामांवरही परिणाम झाला. वीजपुरवठा दीर्घकाळ बंद राहिल्याने परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
मोबाईल सेवाही ठप्प
टोकावडे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तेथील मोबाईल टॉवरची सेवाही बंद पडते. त्यामुळे नातेवाइकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच संपर्क साधण्यासाठी नागरिकांना अडचणी आल्या, असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण भागातील वीज यंत्रणेची देखभाल आणि तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी महावितरणने अधिक तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.