युवातरंग'' म्युझिक थेरपी कार्यक्रम वर्तकनगर माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा..

युवातरंग'' म्युझिक थेरपी कार्यक्रम वर्तकनगर माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा..
Published on: 

वर्तकनगर शाळेत ‘युवातरंग’ची सुरेल मैफल रंगली

ठाणे, ता. २१ (बातमीदार) : अभ्यास, स्पर्धा आणि शिकवण्यांमुळे विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक ताण कमी करून त्यांना संगीताचा आनंद मिळावा, या उद्देशाने ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या वर्तकनगर माध्यमिक विद्यालयात ‘युवातरंग’ संगीत उपचार कार्यक्रम उत्साहात पार पडला. इनरव्हील क्लब ऑफ ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे ब्ल्यू लोटस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘अनुबंध’ संगीत शाळेच्या संस्थापिका, तबलावादक आणि बालमानसोपचारतज्ज्ञ मधुरा रानडे यांनी या अभिनव कार्यक्रमाची संकल्पना मांडली. संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा ताण कमी करणे, मन प्रसन्न करणे आणि शरीरातील सात ऊर्जा केंद्रे अर्थात सप्तचक्रांविषयी जाणीव निर्माण करणे, हा उपक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमात यमन, देस आणि केदार या रागांवर आधारित भक्तिगीते, प्रार्थना, शास्त्रीय व सुगम संगीत तसेच जोशपूर्ण लोकगीतांची सुरेल मेजवानी विद्यार्थ्यांना अनुभवता आली. गायक संदेश आंबोकर, उल्हास भाबल, दीप्ती भाबल आणि प्रज्ञा मंगरुळकर यांनी आपल्या दमदार गायनाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनीही गायकांसोबत गीतगायनात सहभागी होत आनंद लुटला. तबल्यावर मधुरा रानडे, कीबोर्डवर प्रणव कौलगुड आणि ऑक्टोपॅडवर कैलास मोरे यांनी साथसंगत केली. कथ्थक नृत्यांगना श्रुती आंबीकर यांच्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या वेळी रोटरी जिल्हा गव्हर्नर नीलेश जयवंत, कांचन जयवंत, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रेणुका देसाई, रोटरी क्लब ऑफ ठाणे ब्ल्यू लोटसच्या अध्यक्षा मीना जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नीलेश जयवंत यांनी संगीत विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक संस्कार करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नमिता सोमण आणि चिटणीस ॲड. केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com