डिजिटल पुनर्वसन प्रभावी

डिजिटल पुनर्वसन प्रभावी
Published on: 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना पुन्हा दैनंदिन जीवनात सक्रिय होण्यासाठी पुनर्वसन महत्त्वाचे ठरते, मात्र रुग्णालयातून घरी गेल्यानंतर नियमित हृदय पुनर्वसनाची सुविधा मिळणे अनेकदा शक्य होत नाही. अशा वेळी घरबसल्या डिजिटल माध्यमातून दिलेले मार्गदर्शन प्रभावी ठरू शकते, हे केईएम रुग्णालयाच्या अभ्यासातून समोर आले आहे. डिजिटल पुनर्वसन घेणाऱ्या रुग्णांच्या चालण्याच्या क्षमतेत नियमित देखभाल घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत सुमारे २.२ पट अधिक सुधारणा झाली.

केईएम रुग्णालय आणि लुपिन यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यास करण्यात आला. हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया झालेल्या ६० रुग्णांचा यात समावेश होता. त्यापैकी ५८ रुग्णांनी १२ आठवड्यांचा अभ्यास पूर्ण केला. २८ रुग्णांना डिजिटल हृदय पुनर्वसन कार्यक्रम देण्यात आला, तर ३० रुग्णांना नेहमीच्या शस्त्रक्रियेनंतरच्या देखभालीअंतर्गत आहार, औषधे, व्यायाम आणि पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सहा मिनिटांच्या चाचणीत फरक
रुग्णांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी सहा मिनिटांत चालता येणारे अंतर मोजण्यात आले. १२ आठवड्यांनंतर डिजिटल पुनर्वसन गटातील रुग्णांच्या चालण्याच्या अंतरात सरासरी २४३.१७ मीटर वाढ झाली. नियमित देखभाल घेणाऱ्या गटात ही वाढ ११२.१५ मीटर होती. त्यामुळे डिजिटल पुनर्वसन घेणाऱ्या रुग्णांच्या चालण्याच्या क्षमतेत सुमारे २.२ पट अधिक सुधारणा झाल्याचे आढळले.

घरबसल्या व्यायामाचे मार्गदर्शन
डिजिटल कार्यक्रमात रुग्णांच्या शारीरिक क्षमतेनुसार व्यायामाचे नियोजन करण्यात आले. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आरोग्यविषयक माहिती आणि तणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन देण्यात आले. रुग्णांच्या दैनंदिन हालचालींवर डिजिटल साधनांद्वारे लक्ष ठेवण्यात आले. तसेच, साप्ताहिक दृक-श्राव्य संपर्क आणि दूरध्वनीद्वारे व्यायाम, औषधांचे नियमित सेवन आणि आरोग्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. रुग्णालयातून घरी गेल्यानंतरही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी डिजिटल माध्यम उपयुक्त ठरू शकते, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com