नैना संघर्ष पेटणार

नैना संघर्ष पेटणार
Published on: 

नैना संघर्ष पेटणार
शेतकरी संघटनांची वज्रमूठ बांधण्याचा निर्धार; २५ ऑक्टोबरला पनवेलमध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरणार
पनवेल, ता. २१ (बातमीदार) : नैना प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नैना क्षेत्रातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र आणून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी रविवार, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलमध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नैना प्रकल्पाविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष १० जानेवारी २०१३ पासून सुरू आहे, मात्र अनेक वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून, शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ‘५० टक्के शेतकऱ्यांना आणि ५० टक्के नैनाला’ अशी भूमिका मांडली होती. तसेच आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या बैठकीनंतरही वर्ष उलटले, तरी ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बुधवारी (ता. २१) बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार बाळाराम पाटील यांनी सर्व शेतकरी संघटनांनी आपापसांतील मतभेद आणि गैरसमज बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. शेतकऱ्यांच्या जमिनी, हक्क आणि भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर एकजुटीने लढा उभारल्याशिवाय शासनाकडून ठोस निर्णय मिळवणे कठीण असल्याचे मत या वेळी मांडण्यात आले.
बैठकीत अतुल म्हात्रे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या एकत्रित करून त्यांचा अभ्यासपूर्ण पाठपुरावा करण्याची सूचना केली. राजेश केणी यांनी आजवर झालेल्या आंदोलनांचा, उपोषणांचा आणि संघर्षाचा आढावा घेतला. वामन शेळके यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. नंदकुमार पाटील, मोहन गवंडी, संतोष पाटील आणि शेखर शेळके यांनीही आपली मते मांडली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मढवी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. आता २५ ऑक्टोबरच्या बैठकीत सर्व संघटनांची एकजूट साधून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याने या बैठकीकडे नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

एकजुटीतून संघर्षाला बळ
नैना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व संघटनांनी एकाच व्यासपीठावर येऊन सामूहिक भूमिका निश्चित करणे, हा आगामी बैठकीचा महत्त्वाचा उद्देश आहे. संघटनांमधील मतभेद दूर करून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा एकत्रित आराखडा तयार करणे आणि शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करणे, यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांची एकजूट मजबूत झाल्यास आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

आश्वासनांच्या पूर्ततेची मागणी
२०१३ पासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही प्रश्न प्रलंबित राहिल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळात मांडण्यात आलेल्या भूमिकेनुसार शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. २५ ऑक्टोबरच्या बैठकीत या मागण्यांवर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com