केईएमच्या बहुवैद्यकीय पथकाची शस्त्रक्रिया; दीड सेंटीमीटरची गोळी काढली

केईएमच्या बहुवैद्यकीय पथकाची शस्त्रक्रिया; दीड सेंटीमीटरची गोळी काढली
Published on: 

दाेन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गाेळी शरीराबाहेर

ब्लॉगर उमेशची प्रकृती स्थिर; ‘केईएम’च्या डाॅक्टरांना यश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबारादरम्यान उमेश चौहान या ब्लॉगरच्या छातीत लागलेली गोळी शरीरातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. बुधवारी (ता. २१) सकाळी केईएम रुग्णालयाच्या आठ विभागांच्या वैद्यकीय पथकाने दाेन तास उमेशवर शस्त्रक्रिया केली. त्याची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोळी बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी दीड सेंटीमीटरचा छेद देऊन त्याच्या शरीरातून अंदाजे दीड सेंटीमीटरची गोळी बाहेर काढली.

गोळी शरीरात नेमकी कुठे अडकली आहे, हे निश्चित करण्यासाठी डॉक्टरांनी सीटी स्कॅन आणि अन्य तपासण्यांची मदत घेतली. गोळीचे अचूक स्थान निश्चित केले. गोळी यकृताच्या भागातून गेल्याचे आढळल्याने शस्त्रक्रियेदरम्यान विशेष काळजी घ्यावी लागली. या शस्त्रक्रियेसाठी सर्वसाधारण शस्त्रक्रिया विभागासह कार्डियाक ॲनेस्थेशिया, हृदयशल्यचिकित्सा, हृदयविकार, श्वसनविकार, क्ष-किरण या सहा विभागांचे मार्गदर्शन घेऊन हृदयशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. उदय जाधव आणि सर्वसाधारण शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राम प्रजापती यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. कार्डियाक ॲनेस्थेशिया विभागाच्या प्रमुख डॉ. संजीता उंबरकर यांनी भूल देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली. श्वसनविकार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले यांचेही मार्गदर्शन मिळाले. शस्त्रक्रियेनंतर उमेशला अन्न घेता येत आहे. प्रकृतीतील सुधारणा लक्षात घेऊन त्याला रुग्णालयातून घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

वडिलांचा मुलासाठी ३९ तासांचा प्रवास
उत्तर प्रदेशातील ५६ वर्षीय भगवानदास चौहान आणि त्यांचे कुटुंब उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. त्यांचा मुलगा उमेशला गोळी लागल्याचे समजताच त्यांनी एक जोडी कपड्यासह मुंबईची वाट धरली. जवळपास ३९ तासांचा प्रवास करून ते बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले. मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. शस्त्रक्रियेनंतर आता उमेशला आपत्कालीन विभागातील २०-ए वॉर्डमध्ये हलविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com