ठाण्यात २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान शारदोत्सव

ठाण्यात २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान शारदोत्सव
Published on: 

ठाणे, ता. २१ (बातमीदार) : मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांच्या वतीने २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ‘शारदोत्सव २०२६’ रंगणार आहे. या तीनदिवसीय महोत्सवात साहित्यिक मुलाखत, सांगीतिक-साहित्यिक सादरीकरण आणि राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार २०२५ वितरण सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा परिषदेसमोरील स्थानक रोड येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात हे कार्यक्रम होतील. सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महामहोपाध्याय डॉ. मंजिरी देव यांची मुलाखत वृंदा दाभोलकर शुक्रवारी (ता. २३) घेणार आहेत. ‘करुया उद्याची बात’ हा कार्यक्रम शनिवारी (ता. २४) होणार असून, आदित्य ओक हे त्याचे प्रमुख सादरकर्ते, तर कौस्तुभ दिवाण हे सुसंवादक आहेत. रविवारी (ता. २५) राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार २०२५ चा वितरण सोहळा होईल. एशियाटिक सोसायटी, मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यंदा आत्मचरित्र, चरित्र, कादंबरी, प्रवास, समीक्षा-संशोधन, कथा, इतिहास, नाटक, अनुवाद, कविता, विज्ञान, पर्यावरण, बालसाहित्य, संकीर्ण आणि अध्यात्म अशा १५ साहित्यप्रकारांतील पुस्तकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये धनराज खरटमल यांच्या ‘खस्ता’, अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या ‘मी... अल्लादियाखां’, दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या ‘पीळ’, डॉ. गायत्री हर्षे यांच्या ‘अलौकिक अंटार्टिका’, जुई कुलकर्णी यांच्या ‘चेशायर’ आणि महानंदा मोहिते यांच्या ‘घुंगुरमाळा’ या पुस्तकांचा समावेश आहे.
मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर, कार्याध्यक्ष चांगदेव काळे, कार्यकारी विश्वस्त ॲड. मकरंद रेगे, कार्यवाह आणि व्यवस्थापन मंडळाच्या वतीने साहित्यप्रेमींना या महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

श्रीस्थानक साहित्य पुरस्कार विजेते
आत्मचरित्र - धनराज खरटमल; पुस्तक : ‘खस्ता’; प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
चरित्र - अश्विनी भिडे-देशपांडे; पुस्तक : ‘मी... अल्लादियाखां’; प्रकाशक : राजहंस प्रकाशन
कादंबरी - दिवाकर कृष्ण आचार्य; पुस्तक : ‘पीळ’; प्रकाशक : कॉपर कॉइन पब्लिकेशन
प्रवास - डॉ. गायत्री हर्षे; पुस्तक : ‘अलौकिक अंटार्टिका’; प्रकाशक : राजहंस प्रकाशन
समीक्षा-संशोधन - डॉ. शिवाजी शिंदे; पुस्तक : ‘निवडक स्त्री आत्मकथने’; प्रकाशक : शब्द शिवार प्रकाशन
कथा - जुई कुलकर्णी; पुस्तक : ‘चेशायर’; प्रकाशक : देशमुख कंपनी प्रकाशन
इतिहास - श्रीधर लोणी; पुस्तक : ‘पाकिस्तान का मतलब क्या?’; प्रकाशक : राजहंस प्रकाशन
नाटक - डॉ. चंद्रशेखर फणसळकर; पुस्तक : ‘... आणि थोडी ओली पाने’; प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
अनुवाद - सुमती जोशी; पुस्तक : ‘चिडियाखाना’; प्रकाशक : बखर प्रकाशन
कविता - महानंदा मोहिते; पुस्तक : ‘घुंगुरमाळा’; प्रकाशक : माई प्रकाशन
विज्ञान - हेमंत साने; पुस्तक : ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’; प्रकाशक : लोकवाङ्मयगृह
पर्यावरण - संतोष शिंत्रे; पुस्तक : ‘चव्हाटा’; प्रकाशक : सकाळ प्रकाशन
बालसाहित्य - मालविका देखणे; पुस्तक : ‘मायरा आणि देवराईचे गुपित’; प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
संकीर्ण - वैभव खानोलकर; पुस्तक : ‘एक समृद्ध लोककला : दशावतार’; प्रकाशक : श्लोक प्रकाशन
अध्यात्म - डॉ. ज्ञानेश दयारामजी हटवार; पुस्तक : ‘ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व’; प्रकाशक : मधुश्री प्रकाशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com