

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांच्या निर्णयप्रक्रियेत स्थानिक खासदार आणि आमदारांनाही सहभागी करून घेण्याची मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. ‘ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अथॉरिटी’च्या संचालक मंडळावर या लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या समावेशामुळे क्लस्टर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेने क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी स्वतंत्र कंपनी म्हणून ‘ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अथॉरिटी’ची स्थापना केली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळावर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि महापालिकेतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कमाल दोन स्वतंत्र संचालकांचा समावेश आहे. मात्र, महापालिका क्षेत्रातील खासदार आणि आमदारांना या मंडळात स्थान देण्यात आलेले नाही. क्लस्टर पुनर्विकासाशी संबंधित निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींचाही सहभाग असणे आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे. नगरसेवकांबरोबरच खासदार आणि आमदारांचा सहभाग असल्यास प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये निर्माण होणारा संभ्रम दूर करण्यास आणि पुनर्विकासाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
क्लस्टर प्रकल्प हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पाच्या संचालक मंडळात स्थानिक खासदार आणि आमदारांचा समावेश करण्याबाबत महापालिकेत ठरावही करण्यात आल्याचा उल्लेख सरनाईक यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.