

पालघर, ता. २२ (बातमीदार) : आदिवासी आणि वंचितांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. २७) मुंबईत संविधान हक्क संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘सरकारा, सांगा कसं जगायचं’ असा सवाल करत एक लाखाहून अधिक सभासद मंत्रालयावर पायी कूच करणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ यांनी गुरुवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी संस्थापक विवेक पंडित, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि सरचिटणीस विजय जाधव उपस्थित होते. भिवंडीजवळील दिवे येथील महफिल गार्डन ढाबा येथून मोर्चाला सुरुवात होऊन ठाणेमार्गे मंत्रालयावर धडक देण्यात येणार आहे.
प्रलंबित वनजमीन दावे १५ डिसेंबर २०२६ पर्यंत निकाली काढून पात्र आदिवासींना वनपट्टे द्यावेत, जन्मनोंदणी व शासकीय दाखल्यांसाठी स्थानिक पुरावे ग्राह्य धरावेत, गरिबांच्या घरांची सातबारा दप्तरी नोंद करावी, तसेच गावठाण विस्तार करावा, अशा मागण्या करण्यात येणार आहेत. तीन ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत, सक्तीचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांची रिक्त पदे भरणे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत मोफत उपचारांची हमी देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
वनपट्ट्यांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.