

भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : शेलार गावाच्या हद्दीत स्वतःच्या दहावर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वडिलांना २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. कारंडे यांनी हा निर्णय दिला. मनी तांदूनी शेट्टी (वय ३५) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शेलार गावाच्या हद्दीतील अत्तरपाडा येथील झोपडपट्टीत ही घटना घडली. पीडित मुलीच्या रडण्याचा आणि मारहाणीचा आवाज शेजारी राहणाऱ्या एका महिलेला ऐकू आला. तिने इतर महिलांना एकत्र केले. त्यानंतर पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने वडिलांनी अत्याचार केल्याचे सांगितले. याप्रकरणी रुक्मिणी तपकिरे यांच्या फिर्यादीवरून भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास केला. या खटल्यात तपास अधिकारी महिला पोलिस उपनिरीक्षक मेघा राणे, न्यायालयीन कामकाजासाठी नियुक्त पोलिस हवालदार भालचंद्र सदाशिव पाटील, समन्स वॉरंट पोलिस शिपाई युवराज जनार्दन पवार आणि सुनील नानासाहेब घागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिस उपअधीक्षक राहुल झालटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासातील पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सरकारी वकील चंद्रकांत नवले आणि विजय मुंडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.