जमीन मोजणीवरून संघर्ष

जमीन मोजणीवरून संघर्ष
Published on: 

जमीन मोजणीवरून संघर्ष

महागाव-गुंदलेत आदिवासी संघटनांचे ठिय्या आंदोलन

तारापूर, ता. २२ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील महागाव-गुंदले येथे पोलाद उद्योगाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी भूमी सेना आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले ठिय्या आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. आंदोलकांचा विरोध असतानाही पोलिस बंदोबस्तात संमती दिलेल्या १२ खातेदारांच्या जमिनींची मोजणी सुरू करण्यात आल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले.
महागाव आणि गुंदले ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सुमारे १०५ एकर जमीन ‘पास थ्रू’ पद्धतीने संपादित करून परिसरातील पोलाद उद्योगाच्या विस्तारासाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया एमआयडीसीकडून राबविण्यात येत आहे. भूमी अभिलेख विभागाकडून जमीन मोजणीच्या नोटिसा मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी बुधवारपासून आंदोलन सुरू केले. भूसंपादनाची प्रक्रिया जबरदस्तीने राबविली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

शेतकरी भूमिहीन होण्याची भीती
प्रस्तावित भूसंपादनामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक कुटुंबे भूमिहीन होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे. महागाव आणि गुंदले ग्रामसभांनी भूसंपादनाला विरोध करणारे ठराव मंजूर करून प्रशासनाकडे सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. संपादित होणारी जमीन सूर्या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात येत असल्याचा दावा करत, पोलाद उद्योगाच्या विस्तारामुळे प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही स्थानिकांनी व्यक्त केली.

प्रशासनाची समजूत काढण्याची भूमिका
आंदोलनस्थळी पालघरचे उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांनी उपस्थित राहून आंदोलकांशी संवाद साधला आणि जमीन मोजणी प्रक्रियेस सहकार्य करण्याची विनंती केली, मात्र संघटनांनी मोजणी रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहत तीव्र विरोध कायम ठेवला. दरम्यान, पोलिस बंदोबस्तात मोजणीस संमती दिलेल्या १२ खातेदारांच्या जमिनींची मोजणी सुरू करण्यात आली.भूसंपादनामुळे शेती, उपजीविका आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करून प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेमुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com