शिक्षक बनणार ‘इम्पॅक्ट ॲम्बेसेडर’

शिक्षक बनणार ‘इम्पॅक्ट ॲम्बेसेडर’
Published on: 

कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळांमधून कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी ४००हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे बुधवारी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या प्रशिक्षणानंतर शिक्षक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळांमध्ये स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देणार आहेत.

कार्यशाळेत महापालिका, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते. कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मुख्य कार्यांतर्गत असिमेट्रिकल लर्निंग आणि कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या आयोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रशिक्षक जितेंद्र साळी आणि रोहित कांबळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. आदिती देवधर यांनी तयार केलेल्या कार्यपुस्तिकेच्या आधारे कचऱ्याची निर्मिती, त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि कचरा व्यवस्थापनातील नागरिकांची भूमिका यांवर चर्चा करण्यात आली. विविध खेळ, कृती आणि दृश्य सादरीकरणांच्या माध्यमातून शिक्षकांना या विषयाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
प्रशिक्षणानंतर शिक्षक शाळांमध्ये कचरा वर्गीकरणासाठी स्वतंत्र जागा, कार्यपुस्तिका आणि चित्रपत्रकांच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची सवय रुजविणे आणि पर्यावरणाबाबतची जाणीव वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी कार्यशाळेला उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला. असिमेट्रिकल लर्निंगच्या सहसंस्थापिका केतकी सोहोनी यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

 ‘७ आर’  संकल्पना
कचरा कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर, पुनर्विचार आणि पुनर्चक्रण यांसह ‘७ आर’ संकल्पनेवर कार्यशाळेत भर देण्यात आला. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण कसे करावे, त्याची गरज काय आहे आणि त्यासंबंधीची आकडेवारी यांची माहितीही शिक्षकांना देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com