

पूर्णेकर हत्याकांडातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न
हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासाची मागणी
ठाणे, ता. २४ : ठाण्यातील शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी (ता. २४) केला. या प्रकरणाचा तपास बाहेरील सक्षम आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करावा आणि तो उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
सपकाळ यांनी शनिवारी पूर्णेकर यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका केली. पूर्णेकर हे समाजसेवी आणि मदतीसाठी तत्पर असलेले कार्यकर्ते म्हणून परिचित होते. दाट लोकवस्तीतील घराजवळ त्यांची गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे सपकाळ म्हणाले. पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.
हत्याकांडाच्या तपासावर प्रश्नचिन्ह
हत्याकांडाच्या तपासावर प्रश्न उपस्थित करताना सपकाळ यांनी कुटुंबीयांची फिर्याद, त्यांचे जबाब आणि घटनास्थळी मिळालेले पुरावे यांच्या आधारे तपासाची दिशा ठरवण्याची मागणी केली. घटनेपूर्वी पूर्णेकर यांनी व्यक्त केलेली भीती आणि कुटुंबीयांनी संशयितांची दिलेली नावे यांचाही तपासात विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. कुटुंबीयांनी संशय व्यक्त केलेल्या व्यक्तींना बाजूला ठेवून केवळ भाडोत्री मारेकऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कटात सहभागी असलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून संरक्षण दिले जात असल्याचे चित्र असल्याची टीकाही त्यांनी केली.
नव्या एसआयटीची मागणी
सध्याची एसआयटी केवळ औपचारिकता असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. ही समिती गृह विभागाने स्वतंत्रपणे स्थापन केलेली नसून, पोलिसांनी अंतर्गत व्यवस्था म्हणून तयार केली असल्याचे ते म्हणाले. स्थानिक पोलिसांच्या तपासाबाबत कुटुंबीय आणि नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला असल्याने बाहेरील सक्षम आणि पारदर्शक आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नव्याने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. तपासावर उच्च न्यायालयाने देखरेख ठेवावी, असेही सपकाळ यांनी सांगितले. या मागण्यांसाठी सोमवारी (ता. २६) मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कायदा हातात घेणे योग्य नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सपकाळ यांनी टीका केली. सत्तेची उन्मत्तता दाखवून कायदा हातात घेणे योग्य नाही. विरोधकांना संपवण्याच्या दृष्टीने ठाणे, मुंबई आणि राज्यात जे सुरू आहे ते अयोग्य आहे, असे ते म्हणाले. आज सत्तेत असलेल्यांनी उद्या सत्तेबाहेर गेल्यानंतर आपल्या कृतींचे काय परिणाम होतील याचाही विचार करावा, असे वक्तव्य त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.