

पालिकेच्या ई-कचरा संकलनाला चांगला प्रतिसाद
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : पर्यावरण संवर्धन आणि ई-कचऱ्याच्या शास्त्रीय व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे मुख्यालयात ‘विशेष अभियान ६.०’ अंतर्गत ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला महापालिकेच्या विविध विभागांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून ५०० किलोहून अधिक ई-कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये ८४५ टोनर, ५८ की-बोर्ड, ४७ माऊस, १० सीपीयू, १० मॉनिटर, २९ केबल आणि १० पॉवर सप्लाय युनिटचा समावेश आहे.
भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तसेच खनिज मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन (एनसीएमएम), जेएनएआरडीडीसी आणि नवी मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमासाठी महापालिकेच्या सर्व कार्यालयांना वापरात नसलेली, नादुरुस्त आणि कालबाह्य इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार, नगरसेविका रेखा म्हात्रे व संतोषी म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी राजुसिंह चव्हाण यांनी मुख्यालयातील तळमजल्यावर उभारलेल्या संकलन केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
‘आपला ई-कचरा, आपली सामूहिक जबाबदारी’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहर अभियंता, विधी, परवाना, वाहन, शिक्षण, संगणक, लेखा, आरोग्य आणि अतिक्रमण यांसह विविध विभागांनी सहभाग घेतला. संकलित ई-कचऱ्यावर पुढील शास्त्रीय प्रक्रिया करण्यासाठी मंत्रालयाकडे अधिकृत नोंदणी असलेल्या ‘वुई-द रिसायकलिंग कंपनी’ची मदत घेण्यात आली. या संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. पायल नांदुरकर आणि डॉ. वृषभ शहा यांनी महापौर व उपमहापौर यांना ई-कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेची माहिती दिली.
जुने संगणक, टोनर, कार्ट्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची अयोग्य विल्हेवाट लावल्यास माती, पाणी व हवेचे प्रदूषण होऊ शकते. त्यातील घातक घटकांमुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ई-कचरा सामान्य कचऱ्यात मिसळू न देता त्याचे स्वतंत्र संकलन आणि अधिकृत संस्थेमार्फत शास्त्रीय पद्धतीने पुनर्प्रक्रिया करणे आवश्यक आहे. या अभियानातून ई-कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी अशा मोहिमा व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहेत. आगामी काळात शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या आणि महापालिकेच्या अन्य विभागांमध्येही ई-कचरा संकलन मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. शहरातील विविध घटकांचा सहभाग वाढवून हे अभियान नियमितपणे राबविण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.