

तयार शौचालयांना कुलूप
नेरूळ सेक्टर ८ मध्ये नागरिकांची गैरसोय
नेरूळ, ता. २५ (बातमीदार) : बांधकाम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले, पावसाळाही संपला; मात्र नेरूळ सेक्टर ८ मधील दोन सार्वजनिक शौचालये अद्याप नागरिकांसाठी खुली झालेली नाहीत. महापालिकेच्या निधीतून उभारलेल्या या सुविधा कुलूपबंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याप्रकरणी युवासेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत दोन्ही शौचालये सुरू करा अन्यथा १ नोव्हेंबरला ती जनतेसाठी खुली करू, असा इशारा त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नेरूळ सेक्टर ८ मध्ये दोन सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी महापालिकेने एप्रिल २०२६च्या सुमारास कार्यादेश दिले होते. दोन्ही शौचालयांची बांधकामे पूर्ण झाली असून, ती वापरासाठी सज्ज असल्याचा दावा मांडवे यांनी निवेदनात केला आहे.
माजी नगरसेविका सुनीता रतन मांडवे यांच्या पाठपुराव्यानंतर या कामांना गती मिळाली. मात्र, बांधकाम पूर्ण होऊनही शौचालये नागरिकांच्या वापरासाठी खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधांचा लाभ नागरिकांना कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सार्वजनिक शौचालये ही नागरिकांच्या दैनंदिन गरजेची मूलभूत सुविधा आहे. परिसरात अशा सुविधांची आवश्यकता असताना नव्याने बांधलेली शौचालये बंद ठेवण्यामागचे कारण काय, असा सवाल मांडवे यांनी उपस्थित केला आहे. कामे पूर्ण झाली असतील, तर ती नागरिकांच्या वापरासाठी तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अन्यथा सार्वजनिक निधीतून केलेल्या खर्चाचा अपेक्षित उपयोग होत नसल्याची टीकाही त्यांनी केली. याप्रकरणी संबंधित महापालिका कार्यकारी अभियंत्यांकडे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी यापूर्वी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, पाहणी होऊ न शकल्याने आता आयुक्तांकडे दाद मागावी लागल्याचे मांडवे यांनी म्हटले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संयुक्त पाहणी करण्याची मागणी
निखिल मांडवे यांनी आयुक्तांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून दोन्ही शौचालयांची संयुक्त पाहणी करावी, बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ही शौचालये बंद का आहेत, याचे लेखी स्पष्टीकरण द्यावे आणि अनावश्यक विलंब न करता ती नागरिकांसाठी खुली करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.