पुनर्वसित गावांना मैदानं आणि उद्यानं नाहीत

पुनर्वसित गावांना मैदानं आणि उद्यानं नाहीत
Published on: 

पुनर्वसित गावांत उद्यानांची प्रतीक्षा
सार्वजनिक सुविधांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

उलवे, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या तरघर, कोंबडभुजे, उलवे आणि गणेशपुरी या गावांचे पुनर्वसन झाले; मात्र या गावांतील नागरिकांना अद्याप पुरेशा सार्वजनिक सुविधांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे.

पुनर्वसित भागात निवासी इमारती उभ्या राहिल्या आणि लोकवस्तीही वाढली; परंतु मुलांना खेळण्यासाठी मैदाने, नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्याने आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोकळ्या जागांची उपलब्धता हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे पुनर्वसित गावांमध्ये सार्वजनिक सुविधांचे नियोजन नेमके कसे करण्यात आले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

पुनर्वसित भागात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. मुलांच्या शारीरिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक असताना त्यांच्यासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध असणे गरजेचे आहे. युवकांना व्यायामासाठी, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी सुरक्षित जागांची आवश्यकता आहे, मात्र या गरजा पूर्ण करणारी मैदाने आणि उद्याने उपलब्ध नसल्यास नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मर्यादा येतात.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सार्वजनिक सण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी मोकळ्या जागांची आवश्यकता असते. पुनर्वसित गावांमध्ये अशा कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्यास आयोजकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नियोजनाच्या टप्प्यावरच मैदानांसह उद्याने आणि अन्य सार्वजनिक सुविधांसाठी जागा राखून ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सिडकोने ठोस नियोजन करावे
पुनर्वसित गावांमध्ये सार्वजनिक मैदानांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सिडकोकडे करण्यात आली आहे. केवळ निवासाची व्यवस्था करून पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तर नागरिकांना आवश्यक असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या सुविधाही उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरघर, कोंबडभुजे, उलवे आणि गणेशपुरी या गावांतील मोकळ्या जागांचा आढावा घेऊन मैदाने व उद्यानांसाठी ठोस नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com